"आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा..."; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:10 IST2025-03-19T16:06:54+5:302025-03-19T16:10:14+5:30
औरंगजेब वाद आणि नागपूर हिंसाचाराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच भूमिका मांडली. या भूमिकेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली.

"आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा..."; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Nagpur RSS Nana Patole: हिंसाचार समाज स्वास्थासाठी चांगला नाही आणि औरंगजेब हा आजच्या घडीला सुसंगत नाहीये, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. आरएसएसच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहे. आरएसएसची भूमिका आम्ही त्यातले नाही, असे सांगणारी असून, हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
औरंगजेबची कबर हटवण्यात यावी म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने आणि निर्देशने करण्यात आली. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतही याबद्दलची मागणी करण्यात आली. पण, नागपूरमध्ये यावरून हिंसाचार उसळल्यानंतर हा मुद्दा जास्त तापला आहे. या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच भूमिका मांडतांना औरंगजेब आजच्या घडीला सुसंगत नसून, हिंसाचारही समाजाच्या स्वास्थासाठी चांगला नाही, असे स्पष्ट केले.
संघाची भूमिका उशिरा सूचलेलं शहाणपण -नाना पटोले
नाना पटोले म्हणाले, "घटना झालेली आहे. आरएसएसनेच आणलेलं सरकार आहे. आरएसएसने आणलेल्या सरकारमधील मंत्री धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान का टोचले नाहीत? महाराष्ट्र पेटल्यानंतर आता आम्ही त्यातले नाही, हे सांगणं चुकीचे आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे", अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
आरएसएसच्या भूमिकेबद्दल विहिंपची भूमिका काय?
विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी गोविंद शेंडे म्हणाले, "औरंगजेब सुसंगत विषय नाही, हे संघाने म्हटलेलं आम्हाला मान्य आहे. पण, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे आणि त्याचे समर्थन करणे, हे आम्हाला मान्य नाहीये. त्याला आदर्श ठेवणं आम्हाला मान्य नाही."
"आमचं आंदोलन १७ तारखेला होतं. ते संपलेलं आहे. आम्ही पुढची योजना आहे. हे ठरवण्यासाठी भरपूर वेळ आहे. ते ठरल्यानंतर आम्ही सरकारला सांगू", असे गोविंद शेंडे यांनी सांगितले.