चांगले काम केले तर ‘आयारामां’ची गरज का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:19 AM2019-08-30T05:19:33+5:302019-08-30T05:19:39+5:30

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल : नेत्यांना धमकावून पक्षांतर केले जात आहे

Why do bjp need 'Ayaram' if done good work? | चांगले काम केले तर ‘आयारामां’ची गरज का?

चांगले काम केले तर ‘आयारामां’ची गरज का?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप, शिवसेनेने पाच वर्षे चांगले काम केले असेल तर मग त्यांना आमच्या पक्षातल्या नेत्यांची गरज का पडू लागली? भाजप अन्य पक्षातील नेत्यांना ईडीकडून चौकश्या करु अशा धमक्या देऊन पक्षांतर करायला भाग पाडत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत भाजपमध्ये प्रवेश केले त्यांच्या चौकश्या आपोआप थांबल्या. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, मात्र दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना धमकावून, त्यांच्या अडचणींचे भांडवल करुन हे पक्षांतर घडवून आणले जात आहे. त्यांच्याशी झालेली ही बातचित.

 

  • छगन भुजबळ, भास्कर जाधव असे मातब्बर नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत, तुमचा पक्ष सोडावा असे त्यांना का वाटत आहे?

भास्कर जाधव यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांनी अशी कोणतीही चर्चा नाही, मी भेटायला गेलो होतो पण त्याचा आणि पक्षांतराचा संबंध नाही असे मला सांगितले आहे. भुजबळ जातील असे आम्हाला वाटत नाही. दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत आमच्या पक्षातर्फे चर्चा करण्यासाठी ते स्वत: गेले होते. शरद पवार यांना ते दुखावतील असे कोणतेही कारण नाही.

 

  • डॉ. पद्मसिंह पाटील हे तर अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. ते आणि जगजितसिंह राणा पाटील भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर का आहेत?

त्यांच्याबद्दलही माझे तेच मत आहे. डॉक्टर आम्हाला सोडून जातील असे मला बिलकूल वाटत नाही.

 

  • शरद पवारांचे विश्वासू म्हणवणारे नेते का सोडून जात आहेत?

राजकारणात, व्यक्तीगत जीवनात काम करताना चुका घडल्या तर त्याचे भांडवल करुन, त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करुन कोणी त्याचा फायदा घेत असेल तर त्याबद्दल काय बोलावे? जे मतदारसंघ त्यांना जिंकता येत नाहीत असे वाटते त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते पळवण्याचे काम चालू आहे. यांनी पाच वर्षे जनतेची कामे केली नाहीत, विकास केला नाही, म्हणून त्यांना अशा पळवापळवीची गरज पडत आहे. त्यात काहींना सत्तेच्या बाजूने रहावे वाटते, तर काही जणांना सत्ताधारी पक्षात गेले की आपल्यावरील गुन्ह्यांना अभय मिळते असे वाटत असावे.

 

  • तुम्ही विरोधक म्हणून तरी कुठे हे विषय मांडले किंवा लावून धरले?

आमची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. त्या निमित्ताने राज्यभर आम्ही सभा घेत आहोत. तेथे हे सगळे मुद्दे आम्ही मांडत आहोत, पण आमचे मुद्दे समोर येऊ नयेत यासाठी माध्यमांनाही भीती घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत.

 

  • पण इलेक्टीव्ह मेरीट या मुद्यावर तुम्हीच त्याच त्या चेहऱ्यांना संधी दिली?

हे खरे असले तरी शरद पवार यांनी पक्षात नवनवीन चेहरे आणले. त्यांना नेतृत्वाची संधी दिली म्हणून आर.आर. आबांसारखे नेते राज्याचे गृहमंत्री होऊ शकले. पण भाजप वाढवण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलल्या, कष्ट केले त्या कार्यकर्त्यांना सत्ता आल्यानंतर संधी मिळेल असे वाटत होते पण त्यांच्या स्वप्नांवर वरवंटा फिरवण्याचे काम भाजप नेत्यांनी केले आहे. त्यांचेच लोक तीव्र नाराज आहेत. आताचा भाजप काँग्रेस आणि राष्टÑवादी मुक्त पक्ष नसून तो काँग्रेस, राष्टÑवादी युक्त भाजप झाला आहे.

 

  • याचा शेवट काय होणार?

जनता शहाणी आहे. ते हे सगळे पहात आहे आणि त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे. आमच्या यात्रेत आम्हाला त्यांच्या भावना स्पष्टपणे दिसत आहेत. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या एका जाहीर सभेत त्यांनी राष्टÑवादीच्या उमेदवाराला मतदान करा असे भाषण केले. आता प्रवेश केलेले अनेक नेते येत्या काळात भाजपच्या व्यासपीठावर जाऊन असेच आवाहन करताना दिसतील.
 

घोटाळेबाज आमदारांवर साधी चौकशीही नाही....

आधार कशाला हवा. जे काही आहे ते जनतेसमोर आहे. मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या मुंबै बँकेत घोटाळा झाला, त्याचा एफआयआर नोंदला गेला, नाबार्ड ने आॅडीटमध्ये दोष काढले, मात्र अद्यापही त्याची चौकशी नाही की एफआयआर नोंदवल्यानंतर साधे स्टेटमेंटही घेतले जात नाही. प्रसाद लाड यांनी सिडकोची जमीन खाजगी बिल्डरांना विकली. त्याबद्दल आर.सी. चव्हाण यांची समिती नेमली. त्याचा अहवाल अजून आला नाही, त्या विक्रीला स्थगिती दिली असे विधानसभेत सांगितले पण स्थगिती दिलेली नाही. विजयकुमार गावित यांच्या आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराबद्दल न्या. एम.जी. गायकवाड यांची समिती नेमली. त्या समितीचे निष्कर्ष आले, त्यात त्यांना दोषी ठरवले, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. नारायण राणे यांनी पुण्यात वन विभागाची जमीन गृहनिर्माण संस्थेला देण्याचा निर्णय घेतला होता, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले, त्याचे पुढे काहीच झाले नाही, करीरोड येथील अविघ्न टॉवर प्रकरणी त्यांना ईडीच्या चौकशीची नोटीस आली; पण त्याचेही पुढे काहीच झाले नाही. भास्करराव पाटील खतगावकर यांनी नांदेड जिल्हा बँकेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी झाली, त्याचा अहवाल आला पण त्याचेही पुढे काहीच झाले नाही, उलट खतगावकर मात्र भाजपमध्ये गेले. माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीचा लोकायुक्तांचा अहवाल आला, तो अजूनही समोर आलेला नाही, माजी मंत्री एकनाथ खडसे स्वत: ओरडून ओरडून थकले, पण त्यांच्या व्यवहाराची चौकशी करणारा न्या. झोटींग समितीचा अहवालही शेवटपर्यंत विधानसभेत मांडलाच नाही. या सगळ्या प्रकरणामुळेच तर अनेकजण भाजपत जात आहेत.

Web Title: Why do bjp need 'Ayaram' if done good work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.