उद्योगपतींची कर्ज माफ करता, शेतक-यांची का नाही ?: पृथ्वीराज चव्हाण
By Admin | Published: April 3, 2017 10:04 PM2017-04-03T22:04:51+5:302017-04-03T22:04:51+5:30
सरकार देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींची कर्ज माफ करू शकते, मग अडचणीत असलेल्या शेतक-यांची ३० हजार कोटींची कर्ज माफ का करत नाही ?
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर/ पुणे, दि. 3- सरकार देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींची कर्ज माफ करू शकते, मग अडचणीत असलेल्या शेतक-यांची ३० हजार कोटींची कर्ज माफ का करत नाही ? असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी आज सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, इंदापूर या ठिकाणी शेतक-यांशी संवाद साधला त्यानंतर जाहीर सभेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असून निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा प्रश्न चव्हाण यांनी सरकारला केला. या सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय सरकार शेतक-यांसाठी काही करणार नाही. त्यामुळे संघर्ष यात्रेतून सुरु झालेला हा कर्जमुक्तीचा लढा सर्वांनी मिळून आणखी तीव्र करावा असे आवाहन त्यांनी शेतक-यांना केले.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शेतक-यांचा कुठला पक्ष नाही, शेती हाच त्याचा पक्ष आहे म्हणून त्याची कर्जमाफी झाली पाहीजे. शिवसेनेचे मंत्री सांगतात राजीनामे खिशात घेऊन फिरतो. आज शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मी उध्दव ठाकरे यांना आवाहन करतो की, त्यांना शेतक-यांबद्दल आस्था असेल तर आजच सत्तेतून बाहेर पडावे आणि संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, हे सरकार निवडणूका आल्या की आश्वासनाचे गाजर दाखविण्याशिवाय काही करत नाही. ही शेतकरी समाजाच्या अस्तित्वाची लढाई असून शेतकरी पेटून उठला तर सरकार जळून खाक होईल.
पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी, शेकाप नेते प्रविण गायकवाड यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान आज संघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतक-यांनी संघर्ष यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावोगावी शेतक-यांनी संघर्ष यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर सर्व नेत्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकारला सुबुध्दी द्यावी असे साकडे घातले. पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण करून संघर्ष यात्रा उद्या कोकणात दाखल होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लीकन पार्टी, एमआयएम, या सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत.