अशा सरकारचा चहा तरी कशाला प्यायचा?
By Admin | Published: July 12, 2015 02:49 AM2015-07-12T02:49:13+5:302015-07-12T02:49:13+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा
- अतुल कुलकर्णी, मुंबई
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा सरकारचा अधिवेशनाच्या आधी चहा तरी कशाला प्यायचा अशी भूमिका घेत सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात विरोधक आहेत.
गेल्या आठ महिन्याच्या काळात भाजपा शिवसेना सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर आहे. स्वच्छ कारभाराची आणि तात्काळ निर्णयाची हमी देणारे हे सरकार आठ महिन्यातच सपशेल अपयशी ठरल्याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत जी आम्ही सभागृहात
मांडू, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
रविवारी दुपारी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होईल. त्यात अधिवेशनाच्या काळात कोणते विषय कोणत्या दिवशी सभागृहात मांडायचे यावर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.
लोकमतशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केले. तरीही सरकारला जाग येत नाही. शेतकरी उपाशी असताना सरकारची सरकारची चहा बिस्कीटे कशाला घ्यायची असे आपले मत आहे. मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि आम्ही तसे सरकारला कळवून टाकू. मुख्यमंत्र्यांच्याच गावातजेलमधून कैदी पळून जातात, मुंबईत विषारी दारुने १०० बळी घेतले तरीही मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि मनपा आयुक्त तेथे भेट द्यायलाही गेले नाहीत इतके हे सरकार असंवेदनशिल बनले आहे असेही विखे म्हणाले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लोकमतशी बोलताना म्हणाले, शेतकरी संकटात आहे त्यांच्या कर्जमाफीची पहिली मागणी पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्यावर सरकारला धारेवर धरु, घोटाळ्यातल्या मंत्र्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्या पदावर राहू नये अशी मागणी आपण करणार आहोत आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याची अनेक उदाहरणे आम्ही अधिवेशनात मांडू असेही ते यावेळी म्हणाले.