धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 11:51 AM2024-04-28T11:51:23+5:302024-04-28T11:56:17+5:30
Lok Sabha Elections 2024 : महायुतीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
पुणे : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी पुण्यामध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
महायुतीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. कोणी कितीही मोठ्या घोषणा करू द्या. विजयाची येवढी खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली. युतीचे काम करा अन्यथा तुरुंगात टाकू, मग तुम्हाला विजयाची एवढी खात्री आहे, मग धमक्या कशाला देत आहात, असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, बारामती आणि शिरुर मतदारसंघात अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी, उद्योजक हे सर्व काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटीसा देणे, दंड आकारण्याच्या धमक्या देणं, मी बघून घेईल? या धमक्या कशाला देता, तुम्ही काय बघून घेता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. तसेच, बारामतीत शरद पवारांचा पराभव केला हे देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आम्ही सगळी सुप्रिया सुळेंची भावंडं आहोत. बारामतीत तळ ठोका, तंबु ठोका, काहीही होणार नाही,असा टोलाही संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला.
महायुती अद्याप मुंबईमधील दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करू शकले नाही. तसेच, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्येही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही. नाशिकमध्येही अद्याप उमेदवार दिला नाही. खरंतर तो शिंदे गट नाही तर शिवसेना फडणवीस गट आहे. मोदी-शाह प्रायव्हेट लिमिटेड आहे. काही ठिकाणी त्यांना फक्त औपचारीकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसे काल उत्तर मध्य मुंबईत वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात या क्षणाला महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.