शस्त्रपूजा हवी कशाला?
By admin | Published: October 25, 2015 01:40 AM2015-10-25T01:40:32+5:302015-10-25T01:40:32+5:30
देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत.
नागपूर : देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत. एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहे. या स्थितीत जेव्हा शस्त्राची पूजा केली जाते तेव्हा लोकांनी शस्त्र वापरावे, असा संदेश जातो. त्यातून हिंसक प्रवृत्ती वाढते. क्रूरता वाढते. तेव्हा शस्त्रपूजेची आवश्यकता काय? यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) देशात अराजकतेला आमंत्रण द्यायचे आहे का? असा थेट सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.
शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले, फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबाच्या घराला आग लावून दोन चिमुकली मुले जाळण्यात आली. ते या शस्त्रपूजेचेच प्रतीक आहेत. जोपर्यंत शस्त्रपूजा सुरू राहील, तोपर्यंत देशात हिंसकवृत्ती जोपासली जाईल. ही हिंसकवृत्ती काही प्रमाणात मुस्लिमांंच्या विरोधात गोहत्येच्या रूपात वापरली जाते तर दलितांच्या विरोधात क्रूरतेने वापरली जाते. शस्त्रपूजेचे परिणाम आता उघडपणे दिसू लागले आहेत. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्वत:च्या रक्षणासाठी त्यांनाही शस्त्राची गरज वाटू लागली आहे. शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा म्हणून माझ्याकडे मागील महिनाभरात तब्बल ४० अर्ज आले आहेत. आरएसएस आतापर्यंत काय करत होता, हे महत्त्वाचे नाही. परंतु सध्या केंद्रात आणि राज्यात आरएसएसप्रणीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे व वागणे हे शांततेचेच असायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चार्वाकापासून ते तुकारामापर्यंत यांनीसुद्धा धर्म सांगितला आहे. परंतु त्यात शस्त्राची पूजा कुठेही सांगितलेली नाही. काही राजघराण्यात शस्त्रपूजा केली जाते. परंतु ती शस्त्रपूजा ही व्यक्तिगत बाब असते. मनुवादी जातीव्यवस्थेचा विचार केला तर अवजारांची पूजा केली जाते. परंतु ती त्यांच्या रोजच्या वापराची असतात. ती शस्त्रे नाहीत. तसेच जातीव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना तर कुठलेही शस्त्र वापरण्याची परवानगीच नाही. इतिहासात अशोक विजयादशमीचा दिवस आहे. त्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्रे खाली टाकली होती. म्हणजेच तो दिवस हिंसा त्यागण्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिकरीत्या शस्त्रपूजा का केली जात आहे, याचा खुलासा मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)
आठवले-पासवान हे बुजगावणे
वाजपेयी यांच्या काळात भाजपची पर्यायी घटना मी स्वत: सभागृहात उघड केली होती. याची जाणीव खा. रामदास आठवले, रामविलास पासवान आणि उदित राज यांना आहे. भाजपला घटना बदलवायची आहे, हे उघड असताना ते त्यांच्यासोबत आहेत. एखाद दुसऱ्या मुद्यावर ते विरोध करतात. तेव्हा सत्तेत राहायचे व विरोधात बोलायचे हे काही बरोबर नाही. धोरण पटत नसेल तर बाहेर पडा, बुजगावण्यासारखे राहू नका, असे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.