आर्ट्सला जायचेय, तर गणित कशाला?
By admin | Published: June 20, 2017 02:57 AM2017-06-20T02:57:35+5:302017-06-20T02:57:35+5:30
कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे इयत्ता दहावीत हा विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला सोमवारी केली.
शाळेत शिक्षण घेताना, विशेष मुलांनाही होत असलेला त्रास व राज्य शिक्षण मंडळाने या संदर्भात उचललेली पावले, या दोन मुद्द्यांवर प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. गणित व भाषांमध्ये उत्तीर्ण होण्याची क्षमता नसल्याने दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कला किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणात पदवी घेण्याकरिता गणिताची आवश्यकता नाही. त्यामुळे गणिताच्या अभ्यासाची सक्ती केली नाही, तर विद्यार्थी किमान पदवीधर तरी होतील, असेही न्यायालयाने म्हटले.
जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणा
गणित किंवा गणिताशिवाय सात विषयांत उत्तीर्ण झाल्यास, पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची परवानगी यापूर्वी राज्य शिक्षण मंडळ देत होते. त्यांनी (शिक्षण मंडळ) हे बंद करण्याचा निर्णय का घेतला, हे कळत नाही. जुनी पद्धत पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा विचार करा, असे म्हणत न्यायालयाने तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला घेण्याची सूचनाही राज्य सरकारला केली.