कर्जमाफीमुळे सरकारच्या पोटात का दुखते? शरद पवार यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:03 AM2018-01-08T03:03:03+5:302018-01-08T03:05:30+5:30
अडचणीत सापडलेल्या शेतक-याला कर्जमाफी द्यायचे म्हटले की, सरकारच्या पोटात दुखते. मात्र, गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
अकलूज (ता़.माळशिरस, जि़.सोलापूर) : अडचणीत सापडलेल्या शेतक-याला कर्जमाफी द्यायचे म्हटले की, सरकारच्या पोटात दुखते. मात्र, गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
अकलूज येथे रत्नाई महिला वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते़ या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी नेते उपस्थित होते.
पवार म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ८० हजार कोटी रुपये भरले. मात्र, शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत़ अर्थव्यवस्था समृद्ध करणाºया शेती व्यवसायालाच प्रोत्साहन मिळत नाही़ आज साखरेला किंमत नाही़ भाजपा सरकारला पिकवणा-यांपेक्षा खाणा-यांचीच जास्त चिंता आहे. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पवार यांनी मांडली.
‘ते’ बाहेरचे लोक शोधा-
कोरेगाव-भीमामध्ये स्थानिकांमुळे नव्हे, तर बाहेरच्या लोकांनी हिंसाचार केला. सरकारने त्या बाहेरच्यांना शोधून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना केली.
दोन्ही काँग्रेसमध्ये एकी-
नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आले असून, आता या सरकारच्या विरोधात एकत्रित काम करण्याची भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असल्याचे पवार यांनी सांगितले.