जयस्वाल यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही
By admin | Published: June 7, 2017 04:04 AM2017-06-07T04:04:04+5:302017-06-07T04:04:04+5:30
२० दिवस उलटल्यावर आता आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने या आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपेश म्हात्रे संतप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवलीमधील फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही म्हणून युवासेनेने फेरीवाल्यांविरुद्ध केलेल्या आंदोलनास २० दिवस उलटल्यावर आता आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने या आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपेश म्हात्रे संतप्त झाले. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कायदा हातात घेऊन फेरीवाले, रिक्षावाले यांच्यावर हात उचलला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मग त्यांना एक न्याय व आम्हा लोकप्रतिनिधींना एक न्याय हा दुटप्पीपणा कशाला, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला आहे.
स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा माल उधळून लावत युवासेनेने आंदोलन केले होते. २० दिवस उलटून गेल्यावर शिवसेनेच्या दहा जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पोलीस कारवाईचा निषेध करण्याकरिता युवा सेनेचे कार्यकर्ते जामीन घेणार नसल्याचे म्हात्रे यांनी जाहीर केले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. केंद्रापासून महापालिकेपर्यंत हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असून सध्या या दोन्ही पक्षांचे परस्परांशी पटत नाही. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही अधिकारी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करीत नसल्याने शिवसेना रस्त्यावर उतरली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यासह डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा माल फेकून देत आंदोलन केले. या ठिकाणी फेरीचा धंदा करायचा नाही असा दम त्यांनी भरला. हे आंदोलन सुरु असताना पोलिसांची गाडी मागून आली व पोलिसांनी युवा सेनेच्या चार कार्यकर्त्याना ताब्यात घेतले होते. या आंदोलन प्रकरणी फेरीवाला नागेंद्र सोनकर याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, तो कामत मेडिकलच्या गल्लीत २२ वर्षापासून फेरीचा व्यवसाय करीत आहे. युवा सेनेच्या म्हात्रे याने त्याची कॉलर पकडून याठिकाणी धंदा करायचा नाही, असा दम भरला. कार्यकर्त्यांनी सोनकर यांच्या ३५ हजार रुपये किंमतीच्या मालाची नासधूस केली. सोनकर याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दीपेश म्हात्रे, गणेश मिसाळ, नितीन पवार, तेजस तुंगारे, भाई पाणीवडीकर, विजय राजपूत, सुभाष घाग,अंकित जाधव, नीरज साहिल यांच्या विरोधात सोनकर यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
म्हात्रे म्हणाले की, आंदोलन झाले त्याच दिवशी आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याऐवजी उशिराने दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसांना उशिराने जाग का आली ? भाजपाच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी कारवाई केली.
फेरीवाले, रिक्षावाले यांची कॉलर धरुन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाई केली. त्यांचे चित्रीकरण वाहिन्यांवर दिसले व वृत्तपत्रांमध्ये फोटो प्रसिद्ध झाले. यामुळे त्यांच्यावर मीडियाकडून कौतुकाचा वर्षाव केला गेला. मात्र त्यांनी फेरीवाल्यांवर हात उचलून कायदा हातात घेतल्याबद्दल जयस्वाल यांच्या विरोधात कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल केला, असा सवाल म्हात्रे यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना केला. पोलिसांची कारवाई ही भेदभाव दर्शविणारी आहे. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्याना अटक केली तरी चालेल, मात्र पोलिसांच्या दुटप्पी वर्तनाच्या निषेधार्थ कार्यकर्ते जामीन घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.