उद्धव ठाकरे को घुस्सा क्यूं आता हैं ?
By admin | Published: July 7, 2015 03:22 AM2015-07-07T03:22:46+5:302015-07-07T03:22:46+5:30
भारतीय जनता पार्टीने राज्यातील सत्तेमध्ये शिवसेनेचा समावेश करून त्यांची चहुबाजूने कोंडी केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अस्वस्थ आहेत.
संदीप प्रधान, मुंबई
भारतीय जनता पार्टीने राज्यातील सत्तेमध्ये शिवसेनेचा समावेश करून त्यांची चहुबाजूने कोंडी केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अस्वस्थ असून, त्यामुळेच सातत्याने भाजपावर दुगाण्या झाडत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ठाकरे हे वरचेवर भाजपाच्या नेतृत्वावर, भ्रष्टाचारावर तोंडसुख घेत आहेत. ठाकरे यांची ही नाराजी सत्तेत सहभागी होऊनही सत्ताधारी असल्याचा आनंद घेता येत नसल्याचे शिवसेनेतील नेते खासगीत मान्य करतात. कोस्टल रोडची उभारणी मुंबई महापालिकेकडून केली जाईल, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र भाजपाने १० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प महापालिकेमार्फत उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करताना महापालिका आयुक्तांनी महापौर व शिवसेनेला विश्वासात घेतले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार केला. कोस्टल रोड महापालिकेने उभारला असता तर त्याला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा विचार होता. मात्र आता शिवसेनेचे ते स्वप्नही भंग पावणार, अशीच चिन्हे दिसत आहेत. भाजपाच्या केंद्रातील एका मंत्र्याने कोस्टल रोडला बाळासाहेबांचे नाव देण्याच्या शिवसेनेच्या मागणीचे वर्णन ‘बाजारात तुरी...’ असे केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील महापौर बंगल्यात स्मारक उभे करण्याची शिवसेनेची मागणी आहे. मात्र केंद्र सरकारने शासकीय वास्तूंमध्ये स्मारक उभे करण्यास विरोध केला असल्याने ही मागणी धूळ खात पडून आहे. शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना स्मारकाची घोषणा व्हावी, ही अपेक्षा फोल ठरली आहे. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेने विरोध करूनही केंद्राने त्याला धूप घातली नाही. आता जैतापूरच्या गुंत्यातून पाय कसा सोडवायचा, या विवंचनेत सेना आहे.
सेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे समाधानी नाहीत. मंत्री मात्र आपल्याला अधिकार नसल्याचे तुणतुणे वाजवत आहेत. सेना सत्तेत गेली पाहिजे, या दबावापोटी सत्तेत सहभागी होऊनही सत्तेचा लाभ मिळत नाही व मंत्र्यांचा प्रभाव पडत नसल्याने भ्रष्टाचारात अडकलेल्या भाजपा मंत्र्यांवर टीकेची झोड उठवून मित्रपक्षाला अडचणीत आणण्याचा अयशस्वी प्रयत्न ठाकरे करू पाहात असल्याचे भाजपाला वाटते.
महापालिकेतही सेनेला गाठले खिंडीत
महापालिकेतील मलनि:सारण प्रकल्पापासून अनेक प्रकल्पांच्या कामाचे प्रस्ताव सध्या स्थायी समितीत येत नाहीत. शालेय वस्तू खरेदी करण्याऐवजी रोख पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सूतोवाच महापालिका आयुक्तांनी केले आहे. महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत भाजपाने शिवसेनेला खिंडीत गाठल्याचे दिसत आहे.