Maharashtra Bandh: "बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता?"; संतप्त शेतकऱ्यांचा महाविकास आघाडीला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:19 PM2021-10-11T14:19:11+5:302021-10-11T14:19:34+5:30
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून बाजारपेठेत वारंवार फेऱ्या, बाजार समितीमध्ये सकाळी व्यवहार सुरळीत
जळगाव : महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान जळगावात मुख्य बाजारपेठेतील दुकाने आवाहनानंतर बंद करण्यात आली. तर सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे व्यवहार सुरळीत झाले. दुसरीकडे शाळा सुरू आहे, मात्र बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. सकाळी नियमितपणे उघडलेली बाजारपेठ तासाभरातच बंद झाली.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. जळगावात मात्र, सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम नसल्याचे पाहायला मिळाले. शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, यासह बाजारपेठेच्या भागातील ८० टक्के दुकाने नियमितपणे उघडली. मात्र तासाभरातच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करू लागले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून दुकाने बंद करून घेतली. दुकाने बंद झाली तरी कार्यकर्ते व पदाधिकारी १५ ते २० मिनिटानंतर वारंवार बाजारपेठेत फिरत होते. त्यामुळे कोणीही दुकाने उघडली नाही.
भाजीपाला खरेदी सुरळीत
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी व विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी केली होती.
घटनेचा निषेध, मात्र बंद करणे चुकीचे
महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला. उत्तरप्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये घडलेली घटना निषेधार्थ आहे. व्यापारीवर्ग या घटनेचा निषेध करत आहे. पण अशा प्रकारे बंद करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे आधीच व्यापारीवर्ग संकटात सापडला आहे. आता कुठे हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे एक दिवस जरी बाजारपेठ बंद राहिली तर व्यवहारांची साखळी विस्कळीत होते. त्यामुळे जे व्यापारी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होतील, त्यांनी सहभागी व्हावे, मात्र ज्यांचा बंदमध्ये सहभागी होण्यास नकार असेल, त्यांना नाहक त्रास देऊ नये, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचाही बंदला विरोध
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला शेतकरीवर्गाचा विरोध असल्याचे पाहायला मिळाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी बंदला विरोध दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. खरीप हंगाम हातून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतात जो भाजीपाला आहे, तो विकून दोन पैसे आमच्या हाती येत आहेत. असा बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता? असा सवालही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
'कृउबास'तील धान्य बाजारावर परिणाम
शेतकरीवर्गाची गैरसोय होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी भाजीपाला खरेदी-विक्री सुरू ठेवण्यात आली. तसे बंद संदर्भात बाजार समितीला कोणतेही आदेश नव्हते. मात्र, दिवसभर सुरू राहणारा धान्य बाजार व तेथील संपूर्ण व्यवहारावर बंदचा परिणाम जाणवला. धान्य बाजारात कोणीही माल आणत नसल्याने या ठिकाणी बंद सारखेच चित्र होते.
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा
सोमवारच्या बंद संदर्भात शिक्षण विभागाचा कोणताही आदेश नव्हता. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक हजर होते, मात्र बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास धोका पत्करण्यापेक्षा पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे दिसून आले.