... त्यामुळेच मी पुन्हा येईन नाही तर "परत येईन " असे म्हणतो : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 07:05 PM2020-02-12T19:05:06+5:302020-02-12T19:35:35+5:30
प्रत्येक महाविद्यालयाचा कॅम्पस हा तंबाखू आणि धुम्रपान मुक्त करण्याकडे मी लक्ष देणार आहे
पुणे : तुम्हाला मी पुन्हा येईन म्हणालो..अन् जर समजा पंधरा दिवसांत काही घडलं..आणि मी येऊ शकलो नाहीतर उगीच प्रॉब्लेम नको. त्यामुळे मी पुुन्हा येईन असे न म्हणता ''परत नक्की येईन '' असे ठामपणे सांगतो..उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी केलेल्या या टिप्पणीवर सभागृहात एकच हशा उडाला. तसेच त्यांनी हे माझे वाक्य कोणत्याही राजकीय अंगाने नाही म्हणत एकप्रकारे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ''मी पुन्हा येईन '' या वाक्याची जणू आठवणच करुन दिली.
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जनतेचे कामे करण्यासाठी आम्ही मंत्री होतो. पण मंत्री म्हणून काम करताना जर जनतेशी चांगला संवाद करू शकलो तर अनेक कामे सोपी होतात. तसेच विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मानसिकता समजून घ्यायला हवी. प्रत्येक महाविद्यालयाचा कॅम्पस हा तंबाखू आणि धुम्रपान मुक्त करण्याकडे मी लक्ष देणार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घडवण्याचे काम आम्ही कार्यक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत.
सामंत म्हणाले, आम्ही रस्ते, उड्डाणपूल बांधू शकतो पण मानसिकता घडवण्याचे काम ज्याने त्याने केले पाहिजे. कुठलीही मानसिकता घडवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. डॉक्टरेट घेणाऱ्या आणि परदेशातून शिकायला येणाऱ्यांची संख्या देशात जास्त आहे. शरद पवार साहेबांनी राजकीय क्षेत्रात आणले असले तरी सध्या त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत आहे आणि ज्यांच्यामुळे घडलो त्यांना विसरत नाही. अजित पवार एक कार्यक्षम मंत्री म्हणून काम करत आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील पुण्यात येऊन 1200 विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावल्यानंतरच कुलगुरूंना भेटलो.
.....................
कॉलेजमध्ये येताना फार अडचण विद्यार्थी व पालकांची होते. त्यामुळे स्कायवॉक संबंधी काही निर्णय घेता येईल का ? या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला सामंत उत्तर देताना म्हणाले, यासंबंधी मुंबई येथे आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांशी बोलून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावण्यावर माझा भर असेल. तसेच सीओईपीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याबाबत काय सांगाल ? या दुसऱ्या प्रश्नावर या कामासाठी नियोजित समितीकडून जो निर्णय येईल त्याला माझा पाठिंबा असेल असे त्यांनी सांगितले.