भारत फक्त हिंदूंसाठीच का ? - मुंबई उच्च न्यायालय
By admin | Published: April 6, 2016 05:05 PM2016-04-06T17:05:54+5:302016-04-06T17:07:44+5:30
एडस जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालीसाचे कथन ठेवण्याच्या नागपूर महापालिकेच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - एडस जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालीसाचे कथन ठेवण्याच्या नागपूर महापालिकेच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेला भारत फक्त हिंदूंसाठीच आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. यासंबंधी दाखल झालेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने भारत फक्त हिंदूंसाठीच आहे ? असा प्रश्न विचारला.
एडस जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालीसाचे कथन ठेवण्यावर न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले. नागपूर महापालिकेने पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
हनुमान चालीसाच ?, कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्याचे कथन का नाही ? असा सवाल खंडपीठाने विचारला. हनुमान चालीस आणि एडस जनजागृतीचा काय संबंध ? फक्त हिंदूंनाच एडसची लागण होते का ? फक्त हनुमान चालीसाच्या पठणाने रुग्ण या भयंकर रोगातून बरा होणार ? असे प्रश्न खंडपीठाने विचारले.
न्यायालयाच्या कानउघडणी नंतर आयोजकांनी दोन्ही कार्यक्रमांचे वेगवेगळे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हनुमान चालीसा पठण आणि एडस जनजागृती कार्यक्रमामध्ये तासाभराचे अंतर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.