राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय?; बदलापुरातील घटनेनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:39 PM2024-08-20T14:39:33+5:302024-08-20T14:43:46+5:30
सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे.
Jayant Patil ( Marathi News ) :बदलापूर शहरातील एका शाळेत ४ वर्षीय दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्रालयावर हल्लाबोल करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. अशा घटना घडत असताना राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय? असा सवाल पाटील यांनी केला आहे.
बदलापूर घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो, आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे
दरम्यान, "फक्त उद्घाटनं, सोहळे, चमकोबाजीमध्ये व्यस्त असणाऱ्या 'इव्हेंटजीवी' सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा," असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
आधी नवी मुंबई, आता बदलापूर !
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 20, 2024
बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता…
सुप्रिया सुळेंकडूनही कारवाईची मागणी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त केला. "बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. नागरीकांचा रोष अतिशय योग्य असून गृहखात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे. पोलिसांना विनंती आहे की कृपया या व्यक्तीची सखोल चौकशी करुन त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा," अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.