कर्नाटकची मुजोरी! बेळगाव रेल्वे स्थानकात शिवरायांची प्रतिमा लावण्यास विरोध; रोहित पवारांनी केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 02:32 PM2023-02-10T14:32:59+5:302023-02-10T14:39:16+5:30
बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही.
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगावरेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा प्राधान्याने स्थापित केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट द्वारे केली आहे.
नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. परंतु त्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही. तेंव्हा या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनापूर्वी महापुरुषांच्या प्रतिमांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव केला जावा अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे.
कोंडुसकर यांनी रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव व्हावा या मागणीसाठी काल गुरुवारी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते. तसेच रेल्वे स्थानकावर सर्व वीर पुरुषांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या मात्र जाणीवपूर्वक छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारण्यात आली नाही असा आरोप करून मराठी भाषिकांचा एवढा द्वेष का? एवढी मुजोरी योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
शिवरायांच्या प्रतिमेसंदर्भात रमाकांत कोंडुसकर यांनी छेडलेल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. फक्त दखल घेऊन गप्प न बसता आमदार पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारण्यात यावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला डावलले जात असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कानावर शिवरायांच्या अवमानाचा हा प्रकार घालावा, अशी मागणी ही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
#बेळगाव मध्यवर्ती रेल्वेस्थानकात नव्याने अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या, परंतु #मराठी भाषिकांची आग्रही मागणी असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही. मराठी भाषिकांचा एवढा द्वेष का? एवढी मुजोरी योग्य नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2023