भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 06:21 PM2024-06-12T18:21:03+5:302024-06-12T18:21:58+5:30
भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत असून त्यांच्याजागी नवीन अध्यक्ष भाजपाला मिळणार आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.
नवी दिल्ली - मोदी-शाह यांच्या कार्यशैलीकडे पाहिले तर पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असेल हे कुणालाही माहिती नाही. अचानक कुणाला फोन येईल आणि तुम्हाला केंद्रीय नेतृत्व करायचंय सांगितलं जाईल. ही नवीन भाजपा असून याठिकाणी निर्णय अत्यंत गोपनीय पद्धतीने घेतले जातात. मात्र तरीही अनेकदा सूत्रांच्या आधारे जे अंदाज वर्तवले जातात ते खरे ठरतात.
राष्ट्रपतीपदावेळी अनेक लोकांसोबत द्रौपदी मुर्मू यांचं नाव चर्चेत होतं, अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. आता भाजपा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. पक्षातील बी.एल संतोष, सुनील बन्सल, फग्गन सिंह कुलस्ते, केशव प्रसाद मोर्या ही नावे चर्चेत आहेत. या नावांसोबतच आणखी एक नाव प्रखरतेने पुढे येतंय ते म्हणजे महाराष्ट्रातील नेते आणि सध्या बिहारचे प्रभारी असलेले विनोद तावडे. उत्तर भारतात कमी लोक त्यांना ओळखतात. मात्र लोकसभा निवडणुकीत अनेक वृत्तपत्रात ते झळकले आहेत. त्यामुळे विनोद तावडेंच्या जमेच्या बाजू कोणत्या हे जाणून घेऊ.
मराठा चेहरा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात फटका बसला. या निकालामागे मराठा फॅक्टर हेदेखील एक कारण मानलं जातं. भाजपाला राज्यात कायम मराठा नेतृत्वाची कमतरता भासत राहिली. तावडे हे मराठा समाजातून येतात. २०१९ मध्ये पक्षाने त्यांचं तिकिट कापलं. तरीही ते निराश न होता राष्ट्रीय स्तरावर पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळली. मागील ४ वर्षात विनोद तावडे यांनी त्यांच्या कामाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यात विशेषत: नितीश कुमार यांना पुन्हा एनडीएसोबत आणण्यात तावडेंचं मोठं योगदान आहे.
पक्ष संघटनेत उल्लेखनीय काम
गेल्या अनेक वर्षापासून विनोद तावडे पक्ष संघटनेत विविध पदावर कार्यरत आहेत. त्यांना केवळ पद मिळालं नाही तर त्या पदाला न्याय देण्याचं काम विनोद तावडेंनी केले. तावडे हे सध्या पक्षात सक्रीय पदाधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश करण्यात त्यांची भूमिका आहे. इंडिया आघाडीत नितीश कुमार यांची मुख्य भूमिका होती. मात्र विनोद तावडेंनी ज्याप्रकारे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला रोखत नितीश कुमारांना भाजपासोबत पुन्हा आणलं. इतकेच नाही तर बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत एनडीएनं चांगली कामगिरी केली. त्यामुळे तावडेंचं हे संघटन कौशल्य पाहता त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.
संघाशी जवळीक
आरएसएस आणि भाजपा यांच्यात दुरावा झाल्याचं चित्र सध्या सुरू आहे. निवडणुकीत जे.पी. नड्डा यांनी आरएसएसबाबत केलेले विधान चांगलेच गाजले. त्यानंतर आता आरएसएस सातत्याने सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे भाजपा आणि आरएसएस यांच्यातील संबंध फारसे ताणले जाणार नाहीत त्यादृष्टीने अध्यक्षपदी अशा व्यक्तीची नेमणूक केली जाईल ज्याचे पक्ष आणि संघातील नेत्यांशी जवळीक असेल. विनोद तावडे संघातून येतात. त्यांनी संघात आणि पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.