पवित्र पोर्टल असताना एमपीएससी कशाला? ३७ हजार रिक्त जागा भरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:09 PM2022-07-25T12:09:01+5:302022-07-25T12:09:26+5:30
शिक्षण महामंडळ; ३७ हजार रिक्त जागा भरा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिक्षकांच्या ३७ हजार रिक्त जागा भरा अशी मागणी करत पवित्र पोर्टलची अंमलबजावणी पूर्ण झालेली नसताना एमपीएससीद्वारे शिक्षक भरतीचा अट्टाहास का, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने केला आहे. एमपीएससीमार्फत होणारी भरती वेळखाऊ ठरेल. त्यामुळे तत्काळ पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांना संधी द्या, अशी मागणीही शिक्षण महामंडळाने पत्रकार परिषदेत रविवारी केली.
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चार महिन्यातून एकदा घ्यायची होती. पण चार वर्षात एकदा परीक्षा झाली. त्यातून सहा हजार जिल्हा परिषद आणि २ हजार खासगी शिक्षक भरले गेले. ५ वर्षांपासून भरती बंद आहे. ८० टक्के शिक्षण खासगी शिक्षण संस्थांमार्फत दिले जाते. या संस्थांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. कर्नाटकात १५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक आहे. राज्यात विद्यार्थी असताना अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न शासनाकडून निर्माण केला जात आहे, असे महामंडळाचे सरचिटणीस विजय गव्हाणे म्हणाले.
पश्चिम बंगाल, कर्नाटकात एमपीएससीचा प्रयत्न केला तो न्यायालयात टिकला नाही. काही राज्यात पवित्र पोर्टलचा प्रयत्न झाला तो फसला. त्यामुळे वेळ वाया न घालवता भरती लवकर होणे गरजेचे असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. एमपीएससीद्वारे भरती प्रक्रियेस राज्य शिक्षण संस्था चालकांचा विरोध असणार आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना शासनाने सेवेत कायम करण्याची मागणी माजी आमदार विजय गव्हाणे, एस. पी.जवळकर, मिलिंद पाटील यांनी केली आहे.
भरती घोटाळे ताजे
राज्यात एमपीएससीमार्फत वर्ग १, वर्ग २च्या परीक्षा घेऊन मोठ्या विश्वासाने भरती केली जाते. परंतु, राज्यात शिक्षण, आरोग्य, पोलीस क्षेत्रात भरतीमध्ये घोटाळ्यांचे सत्र सुरू आहे. टीईटीमधील घोटाळा संपलेला नाही. अशात शिक्षक भरतीत पुन्हा गैरप्रकार झाल्यास एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे सुरासे म्हणाले.