मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 08:08 PM2023-08-27T20:08:24+5:302023-08-27T20:09:28+5:30
Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. तसेच या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच कोकणातील जनतेलाही राज ठाकरेंनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरे जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हणाले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून. आजच्या जागर यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासियांचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, सातत्यानं कंत्राटं काढायची. त्यातून बिलं घ्यायची आणि खड्डे तसेच ठेवायचे हे चक्र वर्षांनुवर्षे सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीला कुठलातरी भावनिक मुद्दा काढला जातो आणि त्या भावनेच्या भारात मतदान केलं जातं.
हा रस्ता रखडण्यामागचं सुरू असलेलं सर्वात मोठं कारण म्हणजे येथे होणारे जमिनीचे व्यवहार हे आहे. येथील कोकणी माणसांच्या जमिनी ह्या कवडीमोल दरानेव विकत घेतल्या जात आहेत. जेव्हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा ह्या जमिनींची शंभरपट भावाने व्यापाऱ्यांना विक्री केली जाईल. त्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक रस्ता चांगला झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव कसे वाढतात हे समजून घ्या. मी तुम्हाला हात जोडून आवाहन करतो की जमिनी विकू नका. आज ना उद्या कधीतरी रस्ता होईल. तेव्हा त्याची किंमत तुम्हालाच मिळेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.