कर नाही त्याला डर कशाला?

By admin | Published: July 21, 2016 01:59 AM2016-07-21T01:59:02+5:302016-07-21T01:59:02+5:30

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात दिंडेकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली.

Why not fear him? | कर नाही त्याला डर कशाला?

कर नाही त्याला डर कशाला?

Next


पिंपरी : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात दिंडेकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. सत्कार सोहळ्यात काही नगरसेवकांनी मूर्ती पळविली, असा गौप्यस्फोट महापौर शकुंतला धराडे यांनी केला होता. याबाबतच्या प्रश्नाचे पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटले. मूर्तिचोर नगरसेवकांची नावे जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेने करताच महापौर संतप्त झाल्या. ‘मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. कर नाही त्याला डर कशाला?’ असे म्हणत सभागृहात गरजल्या. कोणत्याही चौकशीला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी शिवसनेनेचे नगरसेवक विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती चोरी प्रकरणाचा निषेध करण्याच्या तयारीत होते. ‘महापौर मूर्तिचोर नगरसेवकांची नावे जाहीर करा’ असे लिहिलेले शर्ट परिधान करून शिवसेना नगरसेवक सभागृहात आले होते.
त्यात गटनेत्या उबाळे यांच्यासह अश्विनी चिंचवडे, नीलेश बारणे, संगीता भोंडवे, शारदा बाबर, धनंजय आल्हाट, संपत पवार, संगीता पवार यांनी मूर्तिचोरीचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. सभेचे कामकाज सुरू होताच सुजाता पालांडे यांनी तहकुबीचा ठराव मांडला. त्या वेळी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. महापौरांनी त्यांना बोलण्याची संधी दिली.
उबाळे म्हणाल्या, ‘‘पालखी सोहळ्यातील दिंडेकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. या विषयी महापौरांनी मूर्तीची चोरी नगरसेवकांनी केली, असे माध्यमांना सांगितले. ’’
महापौरांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महापौर तहकुबीचा निर्णय द्या, अशी
मागणी सत्तारूढ पक्षाने केली.
मात्र, तहकुबीची सूचना मान्य न करत, मी पक्षाची नाही, शहराची
महापौर आहे. कर नाही, त्याला डर कशाला, असे संतापून महापौरांनी
मूर्ती चोरीच्या वक्तव्याचा खुलासा केला. (प्रतिनिधी)
>महापौर म्हणाल्या, ‘‘पालखी सोहळ्यातील दिंडेकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. ६५० मूर्ती खरेदीचा मूळ विषय होता. पालखीसोहळ्यात दिंड्यांची वाढ झाली आहे. म्हणून मी ८५० मूर्तींची खरेदी करावी, अशी मागणी प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांच्याकडे केली होती. दिंडेकऱ्यांना मूर्ती भेट द्यावी, असा महापौर म्हणून माझा प्रयत्न होता. मूर्ती खरेदीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.’’
कोणत्याही चौकशीला तयार
सर्वसाधारण सभेनंतर तिसऱ्या मजल्यावरील दालनात महापौर आल्यानंतर त्या भावुक झाल्या. महापौर म्हणाल्या, ‘‘चांगल्या भावनेने मी विषयाचा आदेश दिला होता. याबाबत मलाच दोषी धरण्यात येत आहे. याबाबत काय चौकशी करायची ती करा. मी फक्त आदेश दिला होता. कोणत्याही चौकशीला तयारी आहे. कोणाला न्यायालयात जायचे त्यांनी जावे. खरेदी ज्यांनी केली, ते दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करा.’’ या विषयीची भावना व्यक्त करताना अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ‘‘पालखीसोहळ्यातील वारकऱ्यांना फक्त या वर्षीच मूर्ती भेट दिल्या का, दर वर्षी दिल्या जातात. मग आरोप याच वर्षी का, मी मागासवर्गीय असल्याने काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही महापौर म्हणाल्या.

Web Title: Why not fear him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.