सनातनवर कारवाई का नाही?
By admin | Published: December 2, 2015 02:23 AM2015-12-02T02:23:12+5:302015-12-02T02:23:12+5:30
देशातील वाढत्या असहिष्णुतेवरील चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सनातन संस्थेवर बंदी का घालत नाही, असा सवाल मंगळवारी सरकारला केला.
नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेवरील चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सनातन संस्थेवर बंदी का घालत नाही, असा सवाल मंगळवारी सरकारला केला.
त्या म्हणाल्या, दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हे तिघेही महान उदारमतवादी विचारवंत आणि या देशाचे भूमीपुत्र होते. असहिष्णुतेमुळे तिघांचाही बळी गेला. महाराष्ट्रात सनातन संस्थेचे नाव या संदर्भात वारंवार चर्चेत आले. या संस्थेच्या विचारसरणीचा महाराष्ट्राला किती त्रास सोसावा लागला, त्याची कल्पना सभागृहात उपस्थित अशोक चव्हाणांनाही आहे. त्यावेळी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. सनातन संस्थेचे लोक महाराष्ट्राच्या उदारमतवादी लोकांना धमक्या देतात. तशी पत्रेही लिहितात. चौकशीसाठी केंद्र सरकारकडेही हा विषय गेला. आजवर या संस्थेवर कोणतीही कारवाई का झाली नाही? गृहमंत्री राजनाथसिंगांना मी विनंती करते की सत्तेची सूत्रे आता तुमच्या हाती आहेत. सनातन संस्थेच्या फाईलचे नेमके सत्य काय, ते गृहमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट करावे.
सुप्रिया सुळेंच्या भाषणात हस्तक्षेप करीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू म्हणाले, सनातन संस्थेच्या फाईलवर तत्कालिन गृहमंत्री चिदंबरम यांचा शेरा आहे की सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. या शेऱ्याला अनुसरून सरकारच्या वतीने आम्ही कोर्टात तसे प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. रिजीजूंच्या उत्तरानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता तुमचे सरकार सत्तेवर आहे. तुम्ही त्याच शेऱ्यावर अजूनही ठाम आहात जे पूर्वी आमच्या गृहमंत्र्यांनी लिहिले. याचा अर्थ आमच्या गृहमंत्र्यांनी जे केले ते योग्य होते, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? एका गोष्टीची जाणीव या निमित्ताने करून द्याावी लागेल की पानसरे आणि कलबुर्गींचे खून तुमच्या सरकारच्या कारकिर्दीत घडले. चूक दोनदा झाली की ती बरोबर ठरत नाही. इतकेच मला म्हणावेसे वाटते. (विशेष प्रतिनिधी)