‘आॅनलाइन औषधविक्रीला विरोध का?’
By admin | Published: June 17, 2016 03:14 AM2016-06-17T03:14:44+5:302016-06-17T03:14:44+5:30
इंटरनेटच्या युगात आॅनलाईन हे खरेदी -विक्रीसाठी नवीन व्यासपीठ निर्माण झाले आहे. लोकांमध्ये जनजागृती नसल्याने त्यांना चांगल्या प्रतीची आणि योग्य संकेतस्थळावरुन औषधे घेता येत नाहीत.
मुंबई : इंटरनेटच्या युगात आॅनलाईन हे खरेदी -विक्रीसाठी नवीन व्यासपीठ निर्माण झाले आहे. लोकांमध्ये जनजागृती नसल्याने त्यांना चांगल्या प्रतीची आणि योग्य संकेतस्थळावरुन औषधे घेता येत नाहीत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशातील दुर्गम भागातही सहज औषधे उपलब्ध होऊ शकतात, असा युक्तीवाद करत आॅनलाईन फार्मसीला विरोध का असा सवाल इंडियन इंटरनेट फार्मसी असोसिएशनने (आयपीए) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
आज अनेक वस्तू ग्राहकांना त्यांच्या दारापाशी मिळतात. त्याचप्रमाणे आजारी असणाऱ्या एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा उपयोगी ठरणारी आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची, रुग्णांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही औषधांचा व्यवसाय आॅनलाईन करत आहोत. त्यात कोणतेही गैरप्रकार करत नाही. लोकांनी योग्य त्या साईटवरुन औषधे घेतल्यास रुग्णांची फसवणूक होणार नाही, असा दावा आयपीएने केला.
प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे विकण्यास बंदी आहे आणि आॅनलाईनमध्ये रुग्णांची फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे. प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आॅनलाईन फार्मसीवर
कारवाई करण्यात येत असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)