महाराष्ट्राची तपास यंत्रणा कर्नाटक पोलिसांवर का विसंबून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:32 AM2019-01-18T05:32:19+5:302019-01-18T05:32:38+5:30
दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण; न्यायालयाने केली कानउघाडणी
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करण्यास कर्नाटकातील यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे तपास करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआय व सीआयडीला सुनावले.
पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यास सीआयडीच्या एसआयटीने तपास अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बजावले.
पानसरेंचे मारेकरी शोधण्यास कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश यांच्या हत्येतील अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे, असे एसआयटीने अहवालात नमूद केले. न्यायालयाने याची नोंद घेत म्हटले की, गेल्या सुनावणीतही सीबीआय व सीआयडीने दाभोलकर व पानसरेंचे मारेकरी शोधण्यासाठी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्यांची चौकशी करू, असे म्हटले होते. ‘कर्नाटकमध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची तुम्ही चौकशी करणार. मात्र तुमच्या अहवालात आरोपींना पकडण्यास काय पावले उचलणार, याचा उल्लेख नाही.
आरोपींनी अन्य गुन्ह्यांत दिलेल्या जबाबावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही स्वतंत्रपणे तपास करा. स्वतंत्र पुरावे जमा करा; कारण हे दोन्ही गुन्हे आधी महाराष्ट्रात घडले आहेत. कर्नाटकात नंतर घटना घडली आहे. कर्नाटकातील तपास यंत्रणा प्रगती करत असून महाराष्ट्रातील पोलीस तपास करण्यात अपयशी ठरले आहेत, असे न्यायालयाने म्हटले.
‘पोलीस मेहनत घेत आहेत’आरोपींना पकडण्यास पोलीस मेहनत घेत आहेत, असे सीबीआयतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. अधिकारी काहीच करीत नाहीत, असे नाही. दोन्ही हत्यांचा तपास करण्यासाठी उत्तम पोलीस अधिकारी निवडले आहेत. महाराष्ट्रातील पोलीस कोणत्याही राज्यातील पोलिसांपेक्षा चांगले काम करीत आहेत, असे सिंग यांनी म्हटले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकर याने तो दाभोलकर व पानसरे हत्येत सहभागी असल्याचे मान्य केल्याचा सीबीआयचा दावा आहे.