धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली देऊन सुद्धा शरद पवार कारवाई का करत नाही? भाजपचा हल्लाबोल
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 16, 2021 04:51 PM2021-01-16T16:51:05+5:302021-01-16T16:56:22+5:30
रेणू शर्मा यांच्याबाबत चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल ते येईल; पण करुणा शर्मा यांच्याबाबत राष्ट्रवादी पक्ष कारवाई का करत नाही.
पुणे : शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत चुकीच्या गोष्टींवरून आजपर्यंत कुणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी वेळोवेळी अशा घटनांच्या वेळी कठोर भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र काल झालेल्या बैठकीत पवार यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांनी यावेळी रेणू शर्मा यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र एकप्रकारे त्यांना अभय दिले आहे. पण करूणा शर्मा यांच्याबाबत मुंडे यांनी स्वतः जाहीर कबुली देऊन देखील त्यावर शरद पवार यांनी राजीनामा न घेता गप्प का राहिले? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.
पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपाच्या चौकश्या तुम्ही पोलीस, सीआयडी आणि चालत असेल तर सीबीआयकडून देखील केली तरी आमची काही हरकत नाही. आम्हाला त्यावर काही देणे घेणे नाही. मात्र, धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांच्यासोबत माझे गेल्या काही वर्षांपासून शारीरिक संबंध होते. तसेच त्यांच्यापासून मला दोन मुले आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना माझी नावे देखील दिली आहे, या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. परंतू, धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिल्यावर सुद्धा शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र याच मुद्द्यांवर आमचा आक्षेप असून मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा किंवा पवारांनी तो घ्यावा अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे आहे. भारतीय समाज हा नीतिमूल्ल्यांवर चालतो असेही ते यावेळी म्हणाले.
देशाच्या राजकारणात ज्यावेळी अशा काही घटना घडल्या आहेत त्यावेळी संबंधित व्यक्तीचे राजीनामे घेतले गेले आहे.यावेळी उदाहरणादाखल त्यांनी काही नावांचा उल्लेख देखील केला. त्याच धर्तीवर येत्या सोमवारपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजप महिला मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार आहोत असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही अपेक्षा आहे. ते घुमजाव का करत आहेत हे कळत नाही.
तूर्तास राष्ट्रवादीकडून मुंडेंना अभय..
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करणार असल्याचे जाहीर करत एकप्रकारे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. परंतु, आता याचवरुन राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपकडून पुन्हा एकदा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना करुणा शर्मा प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.
भारतीय राजकारणात ज्यावेळी ज्यावेळी अशा काही घटना घडल्या आहेत त्यावेळी त्यावेळी संबंधित व्यक्तीचे राजीनामे घेतले गेले आहे.यावेळी उदाहरणादाखल त्यांनी काही नावांचा उल्लेख देखील केला. त्याच धर्तीवर येत्या सोमवारपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजप महिला मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार आहोत असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही अपेक्षा आहे. ते घुमजाव का करत आहेत हे कळत नाही.