सणासाठी डीजे कशाला हवा?
By Admin | Published: March 23, 2016 03:04 AM2016-03-23T03:04:34+5:302016-03-23T03:04:34+5:30
कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा कोणताही धार्मिक, सामाजिक सण साजरा करण्यासाठी लाउडस्पीकरची आवश्यकता नाही, असे आपले वैयक्तिक मत आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने होळी
मुंबई : कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा कोणताही धार्मिक, सामाजिक सण साजरा करण्यासाठी लाउडस्पीकरची आवश्यकता नाही, असे आपले वैयक्तिक मत आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने होळी, रंगपंचमीसाठी डीजे हवाच कशाला? अशी विचारणा मलबार हिल येथील एका उच्चभ्रू सोसायटीला केली.
मलबार हिल येथील कासा मिठा या सोसायटीने होळी व रंगपंचमीसाठी डीजे लावण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
या सोसायटीत केंद्रीय महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत, तसेच आजूबाजूच्या सोसायटींमध्येही उच्चभ्रू राहात आहेत. लोकांना सणाचा आनंद संगीत आणि नृत्याच्या सहाय्याने साजरा करायचा आहे. हा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही. त्याशिवाय साउंड बॅरियर्सच्या साहाय्याने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)‘रंगपंचमी, होळी यासारखे सण साजरे करण्यासाठी डीजे हवाच कशाला? मुळातच कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा कोणताही धार्मिक व सामाजिक उत्सव साजरा करण्यासाठी लाउडस्पीकरची आवश्यकताच काय? हे सर्व बंद करायला हवे, हे आमचे वैयक्तिक मत आहे,’ असे म्हणत खंडपीठाने मलबार हिल पोलीस स्टेशनला संबंधित जागेची पाहणी करून बुधवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.