बेकायदेशीर घुसखोरांचा भार भारतीय करदात्यांनी का उचलायचा?- विक्रम गोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 09:05 PM2020-01-15T21:05:37+5:302020-01-15T21:17:24+5:30
मी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा समर्थक
पुणे: मी नागरिक दुरूस्ती कायद्या (सीएए)चा समर्थक असून, या कायदयासंदर्भात मी पूर्णत: पंतप्रधानांच्या बाजूने आहे. देशातील बेकायदेशीर घुसखोरांचा भार हा भारतीय करदात्यांनी का उचलायचा? असा सवाल उपस्थित करीत, या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरण्यास डाव्या विचारसरणीच्या व्यक्ती चिथवत असल्याचा आरोप ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ’१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विक्रम गोखले यांना 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी ‘पिफ’चे संचालक जब्बार पटेल उपस्थित होते.
सीएएचे संदर्भात गोखले यांना विचारले असता त्यांनी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला. देशातील बेकायदेशीर घुसखोरांचा भार हा भारतीय करदात्यांनी का उचलायचा? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींमुळे छेडल्या गेलेल्या सावरकरांच्या मुद्याविषयी छेडले असता ते म्हणाले, ‘मी सावरकर भक्त आहे. त्यांचे संपूर्ण साहित्य मी अभ्यासले आहे. सावरकरांविषयी जे लोक बोलतात त्यांनी सावरकर किती अभ्यासले आहेत याचा विचार करायला हवा. सावरकरांविषयी अपशब्द काढणा-या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना तरी सावरकर किती आणि काय माहिती आहेत? ज्यांना सावरकर कळले नाहीत. ज्यांना केवळ त्यांच्या नावावर राजकारण करायचे आहे. ते लोक सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधाने करीत आहेत. त्यांना कधीच सावरकर कळणार नाहीत. सावरकर नेमके काय होते ते लोकांसमोर मांडलेच गेले नाही. त्यांना मानणा-यांतही दोन तट आहेत. त्यांना बुद्धी आल्यावर सावरकर कळतील. देशातील वातावरण बिघडवण्यासाठी काड्या लावणा-यांबद्दल मला राग येतो.
वेबसिरीजवरील ‘सेन्सॉरशीप’वर देखील त्यांनी तोफ डागली. वेबसिरीजसाठी सेन्सोरशीप नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. तो रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. परंतु सेन्सॉरशीप ही सरकारचीच असावी, कोणाचीही खासगी सेन्सॉरशीप अयोग्यच आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शरद पवार यांचा ‘जाणता राजा’ असा केला जाणारा उल्लेख आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदी यांची केलेली तुलना यावरही गोखले यांनी परखडपणे मतप्रदर्शन केले. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे मला जाणता राजा म्हणा म्हणणाऱ्यांपैकी ते नाहीत. तसेच छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. छत्रपतींशी तुलना करणाऱ्यांनी थोडा तरी विचार करायला हवा होता. मी मोदी भक्त नाही. माझा कोणता पक्षही नाही. सर्वच पक्षात माझे मित्र आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षाचा कधी झेंडा घेतला नाही. ज्यांच्याशी कधीच जमले नाही, ते सर्व एकत्र येतात तेव्हा राजा नक्कीच चांगले करतोय हे समजावे. मात्र राजाप्रमाणे खालच्या पातळीवर काम करणारेही चांगले आणि जाणकार हवेत. तरच ते कार्य तडीस जाते. असे सूचक वक्तव्यही विक्रम गोखले यांनी केले.