"...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 04:57 PM2024-01-27T16:57:05+5:302024-01-27T16:57:58+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. अशी अधिसुचना तर सरकार अगोदरही काढू शकले असते त्यासाठी एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट सरकार पाहत होते का? असं नाना पटोलेंनी विचारले.

why two Deputy CM were absent when Manoj Jarange Patil hunger strike was resolved?" Nana Patole Questions to Eknath Shinde | "...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?"

"...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?"

धुळे - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य केली असेल तर ओबीसींची फसवणूक केलेली आहे. आरक्षणप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट नसून सरकारने फक्त एक अधिसूचना काढलेली आहे व त्यावर हरकती मागवल्या आहेत. सरकारने आरक्षणासंदर्भात अध्यादेश किंवा शासन निर्णय (GR) काढलेला नाही. खोटे बोलून संभ्रम तयार करून मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही त्यामुळे सरकारने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. 

मराठा आरक्षणप्रश्नी धुळे येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा दिला. सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी लाखो समर्थकांसह त्यांना मुंबईला यावे लागले. सरकारचे प्रतिनिधी व जरांगे पाटील यांच्यात चर्चा होऊन रात्री सरकारने एक अधिसूचना काढली व आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. अशी अधिसुचना तर सरकार अगोदरही काढू शकले असते त्यासाठी एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट सरकार पाहत होते का?. मुख्यमंत्री म्हणतात मी ऐतिहासिक निर्णय घेतला पण या संपूर्ण घटनाक्रमात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार कुठेच दिसले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासही दोन उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? हे आश्चर्यकारक आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही असे सरकारने स्पष्ट केले होते मग मराठा समाजाची ओबीसीतूनच आरक्षण दिले पाहिजे या मागणीचे काय झाले? मराठा समाजाला आरक्षण दिले का? आणि दिले असेल ते कुठून, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला हेच कळत नाही. सगळा संभ्रम निर्माण करून सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार फसवाफसवीचे राजकारण करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्या आधीही अनेक आंदोलने झाली. मराठा समाजाने ५८ मोर्चे शांततेत काढले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं. 

दरम्यान, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला आरक्षण दिले पाहिजे त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे हे महत्वाचे आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे व काँग्रेस पक्षाने सातत्याने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी केली आहे. ३० जानेवारीपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे, या अधिवेशनात मोदी सरकारने यावर निर्णय घ्यावा म्हणजे मराठा समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटतील, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: why two Deputy CM were absent when Manoj Jarange Patil hunger strike was resolved?" Nana Patole Questions to Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.