...म्हणून उद्धव ठाकरे संपत नाहीत! राज, स्वतंत्र निवडणूक, भाजपाशी फारकत.... कारण काय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:31 PM2022-06-30T22:31:28+5:302022-06-30T22:32:08+5:30

फक्त सहकलावंताची भूमिका वाट्याला आलेले उद्धव एकदम नायक झाले. भाजप उद्धव यांना संपवेल, असे वाटत असताना त्यांनी अनपेक्षित खेळी केली. आणि, ते हिरो झाले! मुख्यमंत्री झाले. 

Why Uddhav Thackeray does not finished from Politics! Raj, independent elections, split with BJP .... Now Eknath Shinde | ...म्हणून उद्धव ठाकरे संपत नाहीत! राज, स्वतंत्र निवडणूक, भाजपाशी फारकत.... कारण काय

...म्हणून उद्धव ठाकरे संपत नाहीत! राज, स्वतंत्र निवडणूक, भाजपाशी फारकत.... कारण काय

Next

- संजय आवटे

ही गोष्ट २००७ मधील.  
उद्धव ठाकरे यांना मी पहिल्यांदा भेटलो, ते तेव्हा. 'मातोश्री'वर आम्ही दोघेच सुमारे दोन तास बोलत होतो. नाशिकचे माझे शिवसैनिक मित्र, दिवंगत निलेश चव्हाण यांनी या भेटीत पुढाकार घेतलेला. मी आणि उद्धव यांनी बोलावे, असे निलेश यांना का वाटत होते, माहीत नाही. पण, त्यांनी ती भेट घडवून आणली. आणि, आमच्या गप्पा खूप रंगल्या. 

राज ठाकरे यांचे बंड तेव्हा ताजे होते. 

राज यांचा करिष्मा विलक्षण होता. तरूण मुलं आणि विशेषतः महिलांचे राज अगदी लाडके झाले होते. तेव्हा सत्तेत असणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसही राज यांच्या या वादळामुळे हतबुद्ध झाले होते. राज यांचा झंझावात उद्धव ठाकरे थोपवू शकणार नाहीत, असे सर्वांनाच वाटत होते. खुद्द उद्धवही गोंधळलेले होते. 

आमच्या गप्पांमध्ये हा विषय निघालाच. 
मी त्यांना म्हटले, "राज म्हणजे जॉन अब्राहम आहेत. तर, तुम्ही अभिषेक बच्चन आहात. मुलगी बाइकवर बसेल कदाचित जॉन अब्राहमच्या. पण, लग्न करेल अभिषेक बच्चनशी. कारण, तो 'फॅमिली मटेरियल' आहे."

उद्धव खळाळून हसले. 

मी म्हटलं, विनोद सोडा. पण, तुमच्याबद्दल विश्वास वाटतो. तुमचा भरवसा वाटतो. तुमच्याविषयी आदर वाटतो. तुम्ही आपले वाटता. हे सारं तुमचं बलस्थान आहे. लोकांना शेवटी हे हवं असतं. 

नंतर, माझी आणि उद्धव यांची फार मैत्री झाली, असंही नव्हे. किंबहुना, तशा गप्पा पुन्हा कधीच झाल्या नाहीत. पण, माझा अंदाज खरा ठरला. 

राज विरुद्ध उद्धव संघर्षात निःसंशयपणे उद्धव जिंकले. 

त्यानंतर, बाळासाहेब गेले. जाताना त्यांनी 'माझ्या उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा', असे सांगितले. पण, बाळासाहेबांनंतर उद्धव संपतील, अशी चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अभूतपूर्व यश मिळवले. 

तेही पाहायला हवे. 
२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेने भलेभले भुईसपाट झाले होते. अशावेळी विधानसभा निवडणूक भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेणे हे अशक्यप्राय काम होते. युती न करता एकटे लढण्याचा निर्णय उद्धव यांनी घेतला, तेव्हा उद्धव संपले, असे लोकांनी जाहीर केले. बाळासाहेब गेलेले. समोर मोदींसारखे आव्हान आलेले. तरीही, उद्धव जिंकले. विक्रमी जागा त्यांनी मिळवल्या आणि सत्तेतही प्रवेश केला. 

त्यानंतर, सत्तेत असूनही भाजपने मुंबई महापालिकेतच वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा केली. तरीही उद्धव हरले नाहीत. 

२०१९ मध्ये भाजपचा रथ सुसाट असताना, फक्त सहकलावंताची भूमिका वाट्याला आलेले उद्धव एकदम नायक झाले. भाजप उद्धव यांना संपवेल, असे वाटत असताना त्यांनी अनपेक्षित खेळी केली. आणि, ते हिरो झाले! मुख्यमंत्री झाले. 

उद्धव संपतील; संपले, असे आडाखे खूपदा मांडून झाले. 
उद्धव यांना पक्षप्रमुखपद झेपणार नाही, असे सांगून झाले. 
ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद पेलणार नाही, असे बोलून झाले. 
पण, उद्धव ठाकरेंना सगळेच झेपले. 
त्यांनी सगळे शिताफीने सांभाळले. 

एवढे करून, खुद्द बाळासाहेबांची प्रतिमाही एवढी सर्वमान्य नसेल, असे सर्वमान्य, सर्वसमावेशक, समंजस नेते म्हणून ते सर्वज्ञात झाले. 

आजही लोक म्हणताहेत, उद्धव संपले. 
पण, उद्धव यांच्याबद्दल आडाखे बांधणे एवढे सोपे नाही. 
प्रत्येकवेळी त्यांनी लोकांचे अंदाज खोटे ठरवले आहेत, हा इतिहास आहे. 
*
आज काय चित्र आहे? 
एकनाथ शिंदेंकडे असणारी शिवसेना ही कागदावरची आहे. 
तो आकड्यांचा खेळ आहे. 
व्यावहारिक तडजोड आहे. 

खरी जमिनीवरची शिवसेना अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत आहे. सत्तेच्या खेळात एखादा डझन जास्तीचे आमदार म्हणजे पक्षसंघटना नसते. पक्षसंघटना जमिनीवर असते. रस्त्यावर असते. तिला एक भूमिका असते. कारण परंपरा असते. अस्मिता असते. लाखोंचा जनाधार असणारी अशी पक्षसंघटना संपत नसते. 

विधानसभेत अस्तित्वशून्य असला, तरी शेतकरी कामगार पक्ष आजही प्रभावी आहे. एकच आमदार असला, तरी मनसे नावाची संघटना दमदार आहेच. माकप आणि भाकप यांचेही तेज कायम आहे. त्या तुलनेत तर शिवसेनेकडे आणखी बरेच काही आहे. 

कोणी सांगावे, मुख्यमंत्री पदाचं ओझं उतरल्यानं उद्धव ठाकरे अधिक मोकळे होतील. 
या बंडानंतर शिवसेना अधिक तेजाने तळपेल. 
शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात एक जागा आहे.  कागदावरचा कोणताही गट सत्ता मिळवू शकेल. 

मात्र, शिवसेनेची ती जागा कधीच घेऊ शकत नाही. 

इंदिरा गांधींना पक्षातून काढले गेले. त्यांचे निवडणूक चिन्ह गोठवले गेले. तरी त्या हरल्या नाहीत. उलटपक्षी कॉंग्रेससह स्वतःही अधिक तेजाने सिद्ध झाल्या. 
हाही इतिहास आहे. 

उद्धव ठाकरे संपतील की अधिक झळाळून उभारी घेतील, हे येणारा काळ सांगेलच. 

 

Web Title: Why Uddhav Thackeray does not finished from Politics! Raj, independent elections, split with BJP .... Now Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.