शरद पवार मोदींसोबत स्टेजवर का जाणार? वंदना चव्हाण म्हणाल्या मी नाराज, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:10 AM2023-07-31T11:10:36+5:302023-07-31T11:12:37+5:30
राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत.
मोदी सरकारविरोधात एकीकडे विरोधकांची मोट बांधली जात आहे. दुसरीकडे शरद पवारांचा उभा पक्षच भाजपाने फोडला आहे. असे असतानाही राजकीय वैर बाजुला ठेवून शरद पवारांनी पुन्हा एकदा वाट वाकडी करण्याचे धैर्य दाखविले आहे. यातून वेगळा संदेश जाईल अशी भीती विरोधकांना वाटू लागली आहे. परंतू, पवार उद्या पुण्यातील टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला जाणारच आहेत.
यावर राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. परंतू, त्यांनी यामागे कारणही सांगितले आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु याबाबत रोहित टिळक यांनी शरद पवार हे या कार्यक्रमाला हजर राहतील असे स्पष्ट केले आहे.
मोदी-पवार हे व्यासपीठावरून काय भाषणे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील. टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे.
वंदना चव्हाण काय म्हणाल्या...
मला वैयक्तिक दृष्ट्या शरद पवारांच्या या निर्णयावर नाराज आहे. पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे मला वाटतेय. परंतू, शरद पवारांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. टिळक ट्रस्टने पवारांना तशी विनंती केली होती. अजित पवार वेगळे होण्यापूर्वी शरद पवारांनी मोदींना आमंत्रित केले होते, असे वंदना चव्हाण म्हणाल्या.