बाल स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूपाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 05:20 AM2018-03-24T05:20:21+5:302018-03-24T05:20:21+5:30

स्वच्छतेचा जागर घालण्यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. लहान मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बालस्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

 Wide format requirement for child cleanliness campaign | बाल स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूपाची गरज

बाल स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूपाची गरज

Next

मुंबई : स्वच्छतेचा जागर घालण्यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. लहान मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बालस्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ‘स्वच्छ भारत २०१९’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बाल स्वच्छता मोहीम अधिक व्यापक करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.
स्वच्छतेचे बीज लहान मुलांमध्ये शिक्षण घेत असतानाच रुजविले पाहिजे. त्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य या बाबतचे धडे त्यांनी गिरविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे घर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना पालक करतात, त्याचप्रमाणे आपला परिसर, आपली शाळा, आपले गाव, आपले शहर, राज्य, आपला देश स्वच्छ ठेवण्याचेही शिक्षण बालवयात देणे गरजेचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, हात स्वच्छ धुऊन जेवण केल्यानंतर मुलांच्या आरोग्यात ६० टक्के सुधारणा होते. त्यामुळे ही गोष्ट तळागाळातील मुलांमध्ये रुजविण्यासाठी गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. यात कल्पकतेने तयार करण्यात आलेल्या बॅनर, होर्डिंग्ज, डिजिटल इलेक्ट्रॉनिक फलक यांचा वापर करणे हिताचे ठरेल.
बाल स्वच्छता मोहिमेत स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करणारे संदेश स्पर्धांचादेखील समावेश करण्यात यावा. याचबरोबर स्वच्छता या विषयाखाली चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी या स्पर्धांचा समावेश करावा. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश, त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठावेळी सांगायच्या आहेत. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकांमधील स्वच्छताविषयक उपक्रमातून लहानग्यांमध्ये स्वच्छतेचे बीज रुजविणे शक्य आहे.
जेवणापूर्वी व नंतर, तसेच स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री पालकांनी करावयाची आहे. त्याचबरोबर, हीच सवय योग्य असल्याचे मुलांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.
स्वच्छ भारत संकल्प साकार करण्यासाठी बाल स्वच्छतेसह स्वच्छ किल्ले, स्वच्छ शहर, स्वच्छ परिसर या उपक्रमांसह शासनाच्या विविध विभागांतर्फेदेखील स्वच्छता मोहिमेचे आयोजनही त्या-त्या स्तरावर करणे गरजेचे आहे.
दोन वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूच्या जयंतीपासून अर्थात, बालदिनापासून बाल स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पर्यंत ‘स्वच्छ भारत’ हे उद्दिष्ट ठेवले आहे.
हे ध्येय गाठण्यासाठी
देशातील प्रत्येक घटकांची
जबाबदारी आहे. देशात युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने युवा वर्गाने बाल स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वच्छतेचा संबंध थेट आपल्या आरोग्यासाठी आहे, त्यामुळे सानिक व व्यक्तिगत निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संस्कार बालमनावर करणे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. राज्यातील जीवनवहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. आता लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना मिळतील. यामुळे प्रवास करताना योग्य काळजी घेतल्यास सुट्ट्याचा पुरेपूर आनंद घेता येईल. प्रवास करताना विविध गोष्टींना स्पर्श होतो. यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ खाताना हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान शक्यतो बाहेरचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर, प्रवासा दरम्यान धूळ, हवा यांच्या संपर्कात आल्यामुळे खोकला होण्याची शक्यता आहे. लहान-लहान गोष्टींमध्ये स्वच्छतेची काळजी पालकांनी शेवटी लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. यामुळे स्वच्छतेची सवय सर्व स्तरावरील घटकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
-अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

प्रवासादरम्यान बदलत्या हवामानामुळे प्रकृती खालावण्याची शक्यता असते. प्रवासात लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ट्रेनमधील शौचालय अथवा वॉश बेसिन वापरल्यानंतर हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. शिवाय रेल्वे स्थानकावर आणि ट्रेनमधील अधिकृत विक्रेते वगळता अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेणे टाळावे. ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ खाताना लहान मुलांना योग्य सूचना देणे पालकांचे कर्तव्य आहे.
- सुनील उदासी,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title:  Wide format requirement for child cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य