विदर्भ, मराठवाड्याला वावटळीसह गारपिटीचा इशारा, तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
By admin | Published: March 1, 2016 10:50 PM2016-03-01T22:50:35+5:302016-03-01T22:50:35+5:30
वकाळी पावसाने गेल्या दोन दिवस विदर्भ, मराठवाड्याला झोडपले असतानाच पुढील दोन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह गारपीट तसेच वावटळ होण्याचा शक्यता आहे़
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवस विदर्भ, मराठवाड्याला झोडपले असतानाच पुढील दोन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह गारपीट तसेच वावटळ होण्याचा शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी गारांसह गडगडाटी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़. ही स्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़
गेले दोन दिवस दक्षिण कोकण -गोवा, मध्य महाराष्ट्र ते पश्चिम मध्य प्रदेश या दरम्यान असलेली हवेच्या दाबाचे द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण कोकण -गोवा ते दक्षिण गुजरातपर्यंत आहे़त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडू येथील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे़
गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ त्यात विदर्भात अहेरी, सावली, सिंदेवाही येथे ७० मिमी, चिमूर ६०, भामरागड, गडचिरोली प्रत्येकी ४० मिमी, आमगाव, एटापल्ली, जिवती, मूल, मुलचेरा ३०, आर्णी, चामोर्शी, दारव्हा, देवळी, परतवाडा, साकोली २०़ आरमोरी, बल्लारपूर, भद्रावती, बुलढाणा, चांदूरबाजार, चिखलदरा, देवरी, धामणगाव, धानोरा, गोंदिया, आंधप्रदेश, गोंडपिंपरी, हिंगणघाट, कोरपना, लाखनी, मंगरुळपीर, मानोरा, नागभिड, नांदुरा, पोम्भूर्णा, राजूरा, तिवसा, नागपूर येथेही पाऊस झाला़
मराठवाड्यात परभणी येथे २२़५ मिमी पावसाची नोंद झाली़ धुळे येथे १० मिमी पाऊस झाला़
कमी दाबाचा पट्टा आता गोव्याकडे सरकला असून त्यामुळे पुढील दोन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी गारांसह गडगडाटी पाऊस व वावटळ होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ ४ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर कोकण, गोवा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ५ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बुलडाणा १० मिमी, सातारा ५ आणि महाबळेश्वर येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ (प्रतिनिधी)
--------------------