पतीचा विरह असह्य झाल्याने विधवेची आत्महत्या
By Admin | Published: February 5, 2017 10:12 PM2017-02-05T22:12:23+5:302017-02-05T22:12:23+5:30
मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 - वर्षभरापूर्वी मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना बसैय्यनगर येथे रविवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
आशा संदीप मंत्री (३५, रा. मार्तंड विहार सोसायटी, बसैय्येनगर) असे महिलेचे नाव आहे. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी आशा यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. या दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर आशा एकट्याच बसैय्यनगरमधील घरी राहात होत्या. पतीचे निधन झाल्यापासून त्या नाराज राहात असत. पुढील आयुष्य एकटीला जगावे लागेल,अशी खंत त्या बोलून दाखवित असत. त्यातच त्या आजारी राहत असल्याने आयुष्य नकोसे झाल्याचे त्या शेजाऱ्यांना म्हणायच्या.
शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत झोपी गेल्या. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी ओढणीने पंख्याला बांधून गळफास घेत जीवयात्रा संपविली. सकाळपासून आशा यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून सोसायटीतील शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना कळविली. माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे फौजदार बदर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आशा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह घाटीच्या शवगृहात ठेवण्यात आला.मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना पोलिसांनी घटनेची माहिती दिली असून याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एस. जगताप हे करत आहेत.