पत्नीस जाळणा-या पतीस जन्मठेप
By admin | Published: November 4, 2015 02:22 AM2015-11-04T02:22:32+5:302015-11-04T02:22:32+5:30
मूर्तिजापूर येथील प्रकरण , न्यायालयाने तपासले १३ साक्षीदार.
अकोला - मूर्तिजापूर येथील मच्छीपुरा भागात २0१३ मध्ये पत्नीस रॉकेल टाकून पेटविणार्या पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महिलेचे मृत्युपूर्व बयाण व १३ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ५00 रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. बिच्चू ऊर्फ लक्ष्मण शिवरकर असे आरोपीचे नाव आहे. मूर्तिजापूर येथील रहिवासी बिच्चू ऊर्फ लक्ष्मण शिवरकर याने त्याची पत्नी मीना शिवरकर हिला १0 ऑक्टोबर २0१३ रोजी दारू पिण्यासाठी पैसे मागितले; मात्र त्याच्या पत्नीने ९ ऑक्टोबर रोजीच लक्ष्मणला एक हजार रुपये दिले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी दारू पिण्यासाठी त्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर लक्ष्मणने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यामध्ये मीना ७२ टक्के जळाल्याने तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असतानाच कार्यकारी दंडाधिकारी सी. एच. कोवे यांनी मीना शिवरकर यांचे मृत्युपूर्व बयाण घेतले. यामध्ये पतीने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे तिने बयाणात स्पष्ट केले. यावरून मूर्तिजापूर पोलिसांनी लक्ष्मण शिवरकर याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला; मात्र १६ ऑक्टोबर रोजी मीनाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी लक्ष्मणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या खुनाचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी व्ही. पी. बुरुंगे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले. या खून प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयामध्ये झाली. तांबी यांच्या न्यायालयाने मृतक महिलेचे मृत्युपूर्व बयाण व १३ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी लक्ष्मणला कलम ३0२ मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच ५00 रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी दोन महिने सक्तमजुरी भोगावी लागेल. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. पी. पी. नागरे व आरोपीतर्फे अँड. अनिस शहा यांनी कामकाज पाहिले.