पत्नीने पतीकडेच मागितली खंडणी

By admin | Published: August 23, 2016 03:33 AM2016-08-23T03:33:15+5:302016-08-23T03:33:15+5:30

मीरा रोडच्या एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेस सोमवारी सायंकाळी काशिमीरा पोलिसांनी मीरा रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.

The wife has given her husband the ransom | पत्नीने पतीकडेच मागितली खंडणी

पत्नीने पतीकडेच मागितली खंडणी

Next


मीरा रोड : स्वत:चे अपहरण झाल्याचा बनाव करून पतीकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मीरा रोडच्या एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेस सोमवारी सायंकाळी काशिमीरा पोलिसांनी मीरा रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.
प्रियंका शुक्ला (२९, रा. विजय पार्क, मीरा रोड) असे या शिक्षिकेचे नाव आहे. ती राहत असलेल्या परिसरातच स्वत: खाजगी क्लास चालवते. तर, तिचा पती विलेपार्ले येथील खाजगी क्लासमध्ये शिकवतो. रविवारी दुपारी दीड वाजला तरी प्रियंका घरी परतली नव्हती. मात्र, तितक्याच तिच्या मोबाइलवरून तिचे अपहरण केल्याचा मेसेज पतीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आला. तसेच तिचे तोंड व हात आदी बांधलेले असल्याचे फोटोही पाठवले. पत्नी जिवंत हवी असल्यास १० लाखांची खंडणी मागितली. त्यामुळे तिचा पती धास्तावला. त्याने थेट काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला.
काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे अभय कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ६ पथके प्रियंका व कथित अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी रवाना केली. दरम्यान, खंडणी मागणारा आरोपी म्हणून ती पतीशी सतत मोबाइलद्वारे संपर्कात होती. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून तिचा पाठलाग केला. मीरा रोड, दादर, कल्याण, इगतपुरी, भुसावळ, मनमाड असे विविध लोकेशन सापडले. त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत होते.
अखेर, सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ती मीरा रोड रेल्वे स्थानकात पैशांसाठी थांबली. लोकल पकडून जाण्याचा तयारीत असतानाच पोलीस पथकाने तिला शिताफीने पकडले. तिचे लोकेशन तसेच काही स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिचे अपहरण झाल्याची गोष्ट पोलिसांना खटकत होती. सोमवारी सायंकाळी ती हाती लागताच तिने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करून पतीकडे १० लाखांची खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
>यापूर्वी उकळले ८० हजार : प्रियंकाने यापूर्वीदेखील पतीला चिठ्ठी पाठवत त्याच्याकडून ८० हजार रुपये उकळले होते. प्रियंकाला आम्ही ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरू आहे, असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The wife has given her husband the ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.