गुंगीचे औषध देऊन पत्नीने केला खून; घरातच पुरले पतीचे प्रेत
By admin | Published: June 4, 2016 03:19 AM2016-06-04T03:19:02+5:302016-06-04T03:19:02+5:30
पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर एका महिलेने त्याचा खून केला आणि मग दुसऱ्या घरात नेऊन प्रेत नेऊन पुरले. चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीनजीक घडलेला
औरंगाबाद : पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर एका महिलेने त्याचा खून केला आणि मग दुसऱ्या घरात नेऊन प्रेत नेऊन पुरले. चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीनजीक घडलेला धक्कादायक प्रकार दहा दिवसांनंतर शुक्रवारी उघडकीस आला. विलास दादाराव आव्हाड (४०), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी संगीता (३६) ही पसार झाली आहे. मोलमजुरी करणारा विलास हा राजनगरात संगीता, मुलगा किशोर, सून सुरेखा, अन्य एक मुलगा व मुलीसोबत राहत होता. या घटनेनंतर किशोर गायब झाला आहे.
विलास हा गेल्या दहा दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. चार दिवसांपूर्वी संगीता ही भारतनगरात सासू शांताबाई हिच्याकडे आली आणि ‘तुमचा मुलगा मोटारसायकल घेऊन घरातून गेला. चार- पाच दिवस उलटले तरी परत आलेला नाही. चला, आपण त्याचा शोध घेऊ’, असे सांगत ती सासूसोबत अनेक ठिकाणी फिरली. विलासच्या शोधार्थ जंग जंग पछाडत असतानाच गुरुवारी रात्री विलासची सून सुरेखाने फोन करून शांताबाई यांना आपल्या माहेरी सिंदखेडराजाला बोलावले. दुसऱ्या दिवशी सकाळी या तिघींची भेट झाली. तेव्हा सुरेखाच्या आईने विलास याचा खून झाल्याची माहिती शांताबाईना दिली. संगीतानेच विलासचा खून करून प्रेत चिकलठाणा शिवारातील दुसऱ्या घरात पुरल्याचे सुरेखाने सांगितले.
हात दिसल्याने
सुनेला समजला प्रकार!
विलासचा खून केल्यानंतर संगीता घरी आली. तिने किशोर आणि सुरेखाला ‘चला, आपल्याला नव्या घरात मुरूम पसरायचा आहे, असे सांगत दोघांना घेऊन ती ‘त्या’ शेडवर आली. तिघांनी मुरूम पसरविण्यास सुरुवात केली. ढिगारात पुरलेल्या विलासचा हात सून सुरेखाच्या नजरेस पडला. सासूने सासऱ्याचा खून केला आणि प्रेत तेथे पुरले, हे सुरेखाला उमगले. सुरेखाने माहेर गाठले आणि आपल्या आईला प्रकार सांगितला.
कारण गुलदस्त्यात
तीन दिवसांपासून संगीता आणि किशोर बेपत्ता आहेत. ते सापडल्यानंतरच खुनाचे कारण समोर येईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्याठिकाणी हे प्रेत पुरण्यात आले होते, ती जागा संगीताने गुपचूप खरेदी केली होती. घरात याबाबत कुणालाही माहिती नव्हती.
जेवणातून दिले गुंगीचे औषध
च्आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार पती विलासला संपविण्याचा संगीताने निश्चय केल्यानंतर ‘त्या’ रात्री स्वयंपाक करताना भाजीतच संगीताने गुंगीचे औषध टाकले.
च्विलासला गुंगी आल्यानंतर तिने जवळच राहणारा रिक्षाचालक महेशला बोलावले आणि ‘आम्हाला चिकलठाण्यात नणंदेच्या घरी सोड, शंभर रुपये देते’ असे सांगितले. त्यानुसार आपण मित्र गोविंदला सोबत घेतले आणि मग संगीता व तिचा पती विलासला चिकलठाणा शिवारातील वस्तीवर रात्री नेऊन सोडल्याचे रिक्षाचालक महेशने पोलिसांना सांगितले.
च्संगीताने पत्र्याचे शेड असलेल्या घरात नेऊन पती विलासच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि नंतर तेथे खड्डे खोदून प्रेत मुरुमात पुरले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.