चारीत्र्याच्या संशयावरून पतीनेच गळा आवळून केला पत्नीचा खून
By admin | Published: March 12, 2017 10:30 PM2017-03-12T22:30:45+5:302017-03-12T22:33:55+5:30
लहवितची विवाहिता : शवविच्छेदन अहवालात उघड; पतीस अटक
नाशिक : लहवित येथील विवाहिता योगीता नवनाथ काळे हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली नसून, तिच्या पतीनेच गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे़ पोलिसांनी याप्रकरणी पती नवनाथ काळे यास अटक केली असून, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी रविवारी (दि़१२) त्यास अटक केली़
लहवित येथील योगीता नवनाथ काळे या विवाहितेने गुरुवारी (दि़९) राहत्या घरी आत्महत्त्या केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती़ मात्र, घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले तेव्हा योगीताचा मृतदेह तिचा पती नवनाथ याने खाली उतरविलेला होता़ पोलिसांना याचवेळी पतीवर संशय होता. त्यांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केला़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले़
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी संशयित नवनाथ काळे यास रविवारी ताब्यात घेऊन चौकशी केली़ मात्र, प्रथम तो माहिती देण्यास टाळाटाळ करीत होता, त्यास पोलिसी खाक्या दाखविताच चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली़ तसेच पत्नी योगीताने आत्महत्त्या केली, असे वाटावे यासाठी बनाव केल्याचे सांगितले़ याप्रकरणी मयत योगीताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी नवनाथ काळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़ (प्रतिनिधी)