मुलाला वाचवण्यासाठी केली पत्नीची हत्या
By admin | Published: May 13, 2017 01:16 AM2017-05-13T01:16:36+5:302017-05-13T01:16:36+5:30
पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने लहान मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने लहान मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याने पत्नीची हत्या करून पळ काढल्याची कबुली दिली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते.
जयेश शशिकांत महालिम असे पतीचे नाव आहे. तो गोठीवली येथे पत्नी व दोन लहान मुलांसह काही वर्षांपासून रहायला होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी वैशाली घरातून पळून गेली होती. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल होती. यादरम्यान वैशालीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद व्हायचे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी देखील ती घरातून निघून गेली असता, शोध घेवून परत घरी आणण्यात आले होते. यावेळी जयेश याने दीड वर्षाच्या लहान मुलासाठी तरी सोबत राहा, तो मोठा झाल्यानंतर घटस्फोट देवून वेगळे होवू असे सांगितले होते. परंतु वैशालीने आताच वेगळे व्हायचे असल्याचे सांगत, रागाच्या भरात लहान मुलाच्या गळ्यावर कोयता लावुन त्याला मारण्याची धमकी दिली. यावेळी लहान मुलावर आलेले संकट न पाहावल्याने जयेश याने तिच्या हातातून कोयता हिसकावून घेवून, त्याच कोत्याने तिचा गळा कापला. यानंतर त्याने दोन्ही मुलांना स्वत:च्या आई-वडिलांकडे सोडून पळ काढला होता. शिवाय सकाळी शेजारच्या व्यक्तीला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे व मृतदेह घरात असल्याचे सांगितले होते. यावरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या शोधासाठी सहायक निरीक्षक संतोष कोतवाल यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून जयेशचा शोध सुरू असतानाच तो पेण येथील रामवाडी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी त्याठिकाणी छापा टाकून जयेशला अटक केली. अटकेनंतर त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देत, पत्नीने मुलाचे प्राण घेण्याचा प्रयत्न केल्याने तिची हत्या केल्याचे सांगितले.