चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून
By admin | Published: April 12, 2017 10:55 PM2017-04-12T22:55:54+5:302017-04-12T22:55:54+5:30
चारित्र्याच्या संशयातून शिवीगाळ करीत पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 : चारित्र्याच्या संशयातून शिवीगाळ करीत पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. सुरूवातीला जिन्याच्या पायरीवरून खाली पडल्याचा बनाव रचत दिशाभूल करण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र तपासामध्ये स्वत: च खून केल्याची कबुली पतीने दिल्याने खूनाचा हा प्रकार उघडकीस आला. घोरपडी भागातील बी. टी. कवडे रस्त्यावरील सोसायटीमध्ये ही घटना घडली.
तातोबा पांडुरंग गरदाडे ( वय ३३, रा. ओम सोसायटी, वळवीनगर, बी. टी. कवडे, घोरपडी) याला अटक करण्यात आली आहे. मनीषा तातोबा गरजादे (वय ३०, रा. बी. टी. कवडे, घोरपडी) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनिता बेरगळ ( वय ३५, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. मनीषा गरजादे इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या पायरीवरून खाली पडून बेशुद्ध झाल्याने त्यांना नोबेल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. त्यांना ससून रूग्णालयात नेले असता गळ्यावर उठलेल्या वणामुळे हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यादृष्टीने तपासाची सूत्रे फिरली असता पतीनेच खून केल्याची कबुली दिली. मुले घराखाली खेळत होती, त्याचा फायदा घेत पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे आरोपीने सांगितले. तातोबा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. तातोबा हा भारत फोर्ज मध्ये हेल्पर म्हणून बिगारी कामगार होता आणि त्याची पत्नीही मजूर म्हणून काम करीत होती.
मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगताप आणि पीएसआय पाटील यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला.