पत्नीचे "शोले", पतीने माफी मागावी यासाठी चढली गच्चीवर
By Admin | Published: May 26, 2017 11:48 AM2017-05-26T11:48:55+5:302017-05-26T11:48:55+5:30
पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीने शोले स्टाईल गच्चीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे
>ऑनलाइन लोकमत
डोबिंवली, दि. 26 - पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीने शोले स्टाईल गच्चीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. आरती चौधरी असं या महिलेचं नाव आहे. गच्चीवर गेल्यानंतर कठड्यावर उभं राहून आरती आत्महत्येची धमकी देऊ लागली. आरडाओरड करत आरतीने लोकांना गोळा केलं. "माझ्या नव-याला माझी माफी मागायला सांगा, नाहीतर उडी मारुन मी आत्महत्या करेन", अशी धमकीच तिने देऊन टाकली. तिची ही धमकी पाहून लोकांना तर शोले चित्रपटातला धर्मेद्रचा टाकीवरील सीनच आठवला.
जवळपास तासभर हा ड्रामा सुरु होता. एका तासानंतर आरतीचा पती एक सामाजिक कार्यकर्ता आणि पोलीस कॉन्स्टेबलसोबत तिथे पोहोचला, आणि कसंतरी तिला खाली उतरण्यास भाग पाडलं.
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आत्महत्येचा हा ड्रामा गुरुवारी दुपारी 2 वाजता सुरु झाला. चार मजल्यांच्या इमारतीवरील गच्चीवर जाऊन महिलेने आरडाओरड करायला सुरुवात केली की, "माझा पती महेशला घेऊन या, आणि माझी माफी मागायला सांगा. नाहीतर मी आत्महत्या करेन". सहा महिन्यांपुर्वीच महेश आणि आरतीचं लग्न झालं आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ता वर्षा परमार यांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा महेशसोबत त्या घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस कॉन्स्टेबल स्वाती ठोकळही तिथे उपस्थित होत्या.
महेश, वर्षा आणि स्वाती ठोकळ तिघेही गच्चीवर गेले. महेशने आरतीची माफी मागत पुन्हा न भांडण्याचं आश्वासन देताच ती खाली उतरण्यास तयार झाली. आरतीला पोलीस ठाण्यात नेऊन समुपदेशन करण्यात आलं. आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठीच आपण हे केल्याचं तिने सांगितलं आहे.