‘विकिपीडिया स्वास्थ्य’मधून मराठीत उलगडणार आरोग्याच्या माहितीचा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:39 AM2020-02-28T03:39:53+5:302020-02-28T03:40:06+5:30
संकेतस्थळ सुरू; रोगाची लक्षणे, उपचारासंदर्भातील तपशिलात सुधारणा करण्याची संधी
मुंबई : विसाव्या शतकातही इंटरनेटवर मराठी भाषेची योग्य प्रमाणात उपलब्धता नाही. त्यामुळे मराठी भाषेतील ज्ञानकोशाचा मार्ग अनेक वर्षे रखडला आहे. मात्र गुरुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वांद्रे येथील अमेरिका वाणिज्य दूतावासाच्या कार्यालयात अमेरिका वाणिज्य दूतावास आणि विकिपीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वास्थ्य’ या संकेतस्थळाची सुरुवात झाली. या माध्यमातून आरोग्यविषयक पूरक माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
मराठी भाषेनंतर हे संकेतस्थळ हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, तमिळ आदी १० भारतीय भाषांमध्येही सुरू होईल. विकिपीडियाने देशात या उपक्रमाद्वारे सर्वप्रथम मराठीला प्राधान्य दिले आहे. मागील मराठी भाषादिनी त्यांनी काही मराठी व्हिडीओ प्रसारित केले होते. यानंतर आता विकिपीडिया स्वास्थ्य हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. यात आरोग्यविषयक माहिती, आजार तसेच रुग्णालये, डॉक्टर संघटना आदी माहितीचा समावेश असेल.
यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात विकिपीडिया स्वास्थ्यचे संचालक अभिषेक सूर्यवंशी यांनी सांगितले, प्रत्येकाला यासाठी योगदान देता येईल. अचूक माहिती संदर्भासह पोहोचविण्यास मदत होईल. शिवाय आरोग्य हे क्षेत्र सामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे ही अमूल्य माहिती सर्वांसाठी मोफत उपलब्ध होईल.
रोगाची लक्षणे, उपचार यासंदर्भातील तपशिलात सुधारणा करण्याची संधीही वापरकर्त्यांना मिळेल. हा उपक्रम लोकांना आपला वाटावा व त्यात त्यांचा जास्तीतजास्त सहभाग वाढवून विकिपीडियावरील तपशील सुधारला जावा हा यामागील हेतू आहे.
कार्यक्रमात सहभागी झालेले राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, विकिपीडियाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या माध्यमातून सरकारचे आरोग्यविषयक उपक्रम, योजना, शासकीय आरोग्य सेवा यांचीही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. तर जोन्स होपकिन्स स्कूल आॅफ मेडिसिनच्या क्लिनिकल रिसर्चच्या उपसंचालिका डॉ. नीती सूर्यवंशी यांनी वैद्यकीय संज्ञा, वैद्यकीय शाखा, शास्त्रीय संज्ञांचा या उपक्रमात समावेश व्हावा अशी आशा व्यक्त केली.
टप्प्याटप्प्याने वाढविणार माहिती
सुरुवातीला संकेतस्थळात भारतीय उपखंडात आढळणाऱ्या आजारांची माहिती दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती वाढविली जाईल. यात प्रथम गर्भवती-बाळंतीण यांची काळजी, कुष्ठरोग, क्षयरोग, साथीचे रोग, ऋतूबदलामुळे होणारे विशिष्ट आजार आदींची माहिती उपलब्ध केली जाईल.