पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती
By Admin | Published: March 3, 2017 01:21 AM2017-03-03T01:21:36+5:302017-03-03T01:21:36+5:30
बोरीबेल (ता. दौंड) परिसरातील वनखात्याच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत.
देऊळगावराजे : बोरीबेल (ता. दौंड) परिसरातील वनखात्याच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत. एकंदरीत वाढत्या उष्णतेमुळे या जंगलातील पाणवठ्यातील पाण्याने तळ गाठल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांना लोकवस्तीकडे यावे लागते.
रस्ता ओलांडताना या वन्य प्राण्यांना अपघातास सामोरे जावे लागते. परिणामी वन्य प्राण्यांना मृत्युमुखी पडावे लागते. तेव्हा वन खात्याच्यावतीने या परिसरातील पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
या परिसरातील जंगलात मोर, लांडोर, चिमण्या, कावळे, पाखरं, कोल्हा, कुत्रे, हरिण, जंगली ससे यांसारखी वन्यप्राणी राहत आहेत. बोरीबेलच्या परिसरात डोंगर भाग जास्त असल्याने या परिसरात उष्णतेचे प्रमाण नेहमीच जास्त असते .
या भागापासून भीमा नदीचे अंतर जास्त असल्याने शेतकऱ्यांना पाईपलाईनद्वारे पाणी आणणे शक्य नाही. त्यामुळे या भागात पाण्याची समस्या नेहमीच सतावत असते. गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा लवकरच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे.
(वार्ताहर)
>पालापाचोळा,धूळ ...
वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोरीबेल येथील जंगलामध्ये पाणवठे तयार करण्यात आले आहेत; परंतु ते पाणवठे अद्याप पाण्याने भरले नाहीत. येथील काही पाणवठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, धूळ, मातीचा गाळ पडल्याने ते खराब झाले आहे.परिणामी, यामध्ये पाणीसाठवण क्षमता कमी झाल्याने वनविभागाच्या वतीने या पाणवठ्यातील पालापाचोळा व मातीचा गाळ काढावा.
>सेवाभावी संस्थांना
मदतीचे आव्हान
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने बोरीबेल परिसरातील डोंगराळ भागातील वन्य प्राण्यांची पाण्याअभावी भटकंती सुरू झाली आहे. तेव्हा तालुक्यातील सेवाभावी संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या वन्यप्राण्यांच्या पिण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पुढे येत आहे.
बोरीबेल परिसरातील वन्यप्राण्यांसाठी बांधण्यात आलेल्या पाणवठ्यांतील पालापाचोळा, गाळ काढण्यात येणार आहे. तसेच वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येणार आहे.
- किशोर येळे,
वन अधिकारी