येऊरमध्येही वन्यजीव गणना
By Admin | Published: May 18, 2016 03:17 AM2016-05-18T03:17:14+5:302016-05-18T03:17:14+5:30
प्राणी - पक्ष्यांचे अस्तित्त्व आहे की नाही यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी वन्यजीव गणना याही वर्षी केली जाणार आहे.
ठाणे : येऊर परिक्षेत्रात वावर असलेल्या प्राणी - पक्ष्यांचे अस्तित्त्व आहे की नाही यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी वन्यजीव गणना याही वर्षी केली जाणार आहे. या परिक्षेत्रातील २० पाणवठ्यांवर ती केली जाणार असून बुद्धपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच येत्या २१ मे रोजी तिला सुरूवात होणार आहे.
येऊर वनपरिक्षेत्र विस्तीर्ण परिसर आहे. या परिक्षेत्रांतर्गत येऊर, घोडबंदर, चेना आणि नागलाबंदर ही चार ठिकाणे येतात. या परिसरात साधारणपणे बिबट्या, रानमांजर, तरस, रानडुक्कर, विविध प्रकारांचे पक्षी, अजगर, नाग, सांबर, चितळ, माकडं, वानरं, मुंगूस, वटवाघूळ, घुबड, रानकोंबडी, मोर, भेकर या वन्यजीवांचा वावर आहे. दरवर्षी वन्यजीव गणनेच्या माध्यमातून या वन्यजीवांचे निरीक्षण आणि संख्या नोंदविली जाते. २१ मे रोजी गणनेस सुरूवात होणार असून यासाठी वनविभाग कर्मचारी आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी एक ते दोन कर्मचारी आणि त्यांच्यासह एका स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे.
या दिवसांत जंगलात पाणी देखील कमी असते त्यामुळे नेमक्या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यांवर येऊन प्राणी पक्षी येऊन पाणी पितात. या पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राणी पक्ष्यांचे निरीक्षण करुन त्यांची संख्या नोंदविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
याव्यतिरिक्त वन्यजीवांचे ओरखडे, विष्ठा, त्यांची पाऊले यांसारख्या खुणांवरुन ही गणना केली जाणार असल्याचे येऊर वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे. गणना दरम्यान शांतता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, एकमेकांशी बोलू नये, सफेद रंगाचे कपडे परिधान करु नये, मोबाईलचा वापर टाळावा, कॅमेराचा वापर न करणे आदी सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते. २४ तास ही गणना सुरू असेल, असेही सांगण्यात आले आहे.