शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना मंत्रिपद देणार का? शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:17 PM2022-08-08T14:17:11+5:302022-08-08T14:17:53+5:30
टीईटी घोटाळ्याची सरकारने गंभीरपणे चौकशी करावी. अब्दुल सत्तार यांची अनेक प्रकरणे आहेत असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
औरंगाबाद - टीईटी घोटाळ्याची चौकशी अगदी सुरुवातीपासून झालीय. भाजपाच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार आहे. तुमचं सरकार आहे. चौकशी लावा. काँग्रेस सरकार असताना शिवाजीराव निलंगेकर यांच्याबाबत असाच आरोप झाला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता अब्दुल सत्तार यांच्यावर असे आरोप होत असताना त्यांना मंत्रिपदावर घेणार का? असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपाला विचारला आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, टीईटी घोटाळ्याची सरकारने गंभीरपणे चौकशी करावी. अब्दुल सत्तार यांची अनेक प्रकरणे आहेत. ते आमच्यासोबत होते म्हणून बाहेर काढता येत नव्हते. अनेकजण त्यांच्याविरोधात प्रकरणं घेऊन पुढे येतात. राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. मी स्वत: ५ वर्ष महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होतो. माझ्यावर हायकोर्टाने कधी ताशेरे ओढले नव्हते असं त्यांनी सांगितले.
तसेच अब्दुल सत्तारांनी बडबड करू नका. शांत राहा. सरकारला या प्रकरणाची सीआयडी चौकशी करायला लावा. टीईटी घोटाळ्याची चौकशी शासकीय अधिकाऱ्यांनीच केली. भाजपा सरकार काही जणांना कधीच माफ करत नाही. अब्दुल सत्तारांना मंत्रिपद पाहिजे असेल तर शांत राहा असा सल्ला देतो. हजारो मुलांचे नुकसान कोणी केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमच्याकडे प्रत्येकाच्या फाईल्स असतात. पक्षाला घातक असणाऱ्यांचा रेकॉर्ड ठेवला जातो असंही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून टीईटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. अशातच शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन नावे आहेत. या नावांवर देखील सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. मी अब्दुल सत्तार आहे त्यांच्या नावात पुढे शेख लावले आहे. या नावांतही तफावत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.