एसी डबल डेकरची वेळ बदलणार?

By admin | Published: August 16, 2016 02:06 AM2016-08-16T02:06:37+5:302016-08-16T02:06:37+5:30

कोकण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी डबल डेकर ट्रेनची वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज बांधत मुंबईतून

Will AC double decker change? | एसी डबल डेकरची वेळ बदलणार?

एसी डबल डेकरची वेळ बदलणार?

Next

मुंबई : कोकण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी डबल डेकर ट्रेनची वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज बांधत मुंबईतून डबल डेकर ट्रेन सुटण्याची सकाळची वेळ बदलण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेची बोलणी सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली.
२0१४मध्ये गणेशोत्सवकाळात एलटीटी ते मडगाव अशी एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र प्रिमियम म्हणून सुरू केलेल्या या ट्रेनला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. अवाच्यासवा भाडे वाढवण्यात येत असल्याने प्रवाशांनी या ट्रेनकडे पाठच फिरवली.
त्यानंतर गर्दी नसलेल्या काळात म्हणजेच दिवाळीत कोकणसाठी ही गाडी पुन्हा चालविण्यात आली. परंतु गर्दीचा काळ नसल्याने ही ट्रेन रिकामीच धावू लागली. त्यानंतर देखभाल-दुरुस्तीचे कारण देत डबल डेकर सायडिंगलाच ठेवण्यात आली. याचा गाजावाजा झाल्यानंतर पुन्हा एकदा एसी डबल डेकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नवीन एसी डबल डेकर ९ डिसेंबर २0१५पासून एलटीटी ते मडगाव सुरू करण्यात आली. ही ट्रेन पुन्हा सुरू होताच तिला सुरुवातीलाच ५२ टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर हा प्रतिसाद कमी होत गेला. ही ट्रेन सुरू होताच त्याला सुरुवातीपासूनच मिळणारा कमी प्रतिसाद यामुळे त्याची माहिती रेल्वेकडून घेण्यात आली असता ट्रेनची पहाटेची असलेली वेळ आणि त्याला लागणारा जादा वेळ हे कारण असल्याचे समोर आले.
एसी डबल डेकर ट्रेन एलटीटीहून (लोकमान्य टिळक टर्मिनस) पहाटे साडे पाच वाजता सोडली जाते आणि मडगाव येथे त्याच दिवशी १७.५0 वाजता पोहोचते. प्रवाशांना एलटीटीहून पहाटेची ट्रेन पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता म्हणाले की, डबल डेकर ट्रेनला कमी प्रतिसाद मिळतो. कोकणातून सुटताना ६0 टक्के तर मुंबईतून सुटताना ट्रेन फक्त ४0 टक्केच प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले. या ट्रेनची असलेली पहाटेची वेळ सोयीस्कर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे डबल डेकर ट्रेनची वेळ संध्याकाळची ठेवता येते का याची चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेशीही चर्चा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

डबल डेकरपेक्षा जनशताब्दीला अधिक पसंती
१एलटीटीहून एसी डबल डेकर पहाटे साडे पाच वाजता सोडण्यात येते आणि मडगाव येथे संध्याकाळी ५.५0 वाजता पोहोचते.
२तर दादर ते मडगाव जनशताब्दी ही पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि मडगाव येथे येथे संध्याकाळी ४ वाजता पोहोचते.
३जनशताब्दी दादर येथून सुटतानाच ती मडगाव येथे डबल डेकरच्याही आधी पोहोचत असल्याने प्रवाशांनाही ही ट्रेन सोयीची पडते. त्यामुळे या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळतो.

Web Title: Will AC double decker change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.