साडेतीन कोटी रुपयांमध्ये मिळणार विमान, ५००, १ हजारच्या नोटाही स्वीकारणार
By admin | Published: November 10, 2016 04:02 PM2016-11-10T16:02:49+5:302016-11-10T16:04:20+5:30
५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे एका फटक्यात काही लाख कोटी रुपयांचे महत्व शून्य झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे एका फटक्यात काही लाख कोटी रुपयांचे महत्व शून्य झाले आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना ५०० आणि १ हजारच्या नोटांचे करायचे काय ? असा प्रश्न पडला आहे. अनेकजण या निर्णयामुळे चिंतेत असताना अंधेरीस्थित एका विमान कंपनीने हीच संधी साधून विमान विक्रीचे मार्केटींग सुरु केले आहे.
ही कंपनी चार्टर्ड प्लेनची विक्री करते तसेच श्रीमंतांना विमान भाडयावर देते. डीएनए दैनिकाच्या वृत्तानुसार बुधवारी कंपनीने संभाव्य खरेदीदारांना कार खरेदी करता तसेच विमान विक्त घ्या. फक्त साडेतीन कोटी रुपयात. ५०० आणि १ हजारच्या नोटाही स्वीकारल्या जातील असा संदेश पाठवला आहे. या कंपनीने नुकतीच उत्तर भारतामध्ये चार्टर्ड विमानाची सेवा सुरु केली आहे.
विमानाचे पार्किंग, देखभाल, वैमानिक आणि अभियांत्रिकी सेवा देण्याचेही आश्वासन दिले आहे. कंपनीच्या प्रवर्तकाने याबद्दल ऑन रेकॉर्ड काहीही बोलण्यास नकार दिला. पण इतक्या महागडया किंमतीला विमान खरेदी केल्यानंतर ग्राहकाची इन्कम टॅक्सच्या कचाटयातून सुटका शक्य नाही याकडे लक्ष वेधले त्यावर प्रवर्तकाने अनेक मार्ग असतात ते तुम्ही आमच्यावर सोडा असे उत्तर दिले.