प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:47 PM2024-07-22T17:47:14+5:302024-07-22T17:49:48+5:30
प्रसाद लाड यांच्या ऑफरवर जरांगे पाटलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला आहे.
Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. फडणवीसांवर झालेल्या टीकेनंतर भाजपकडून आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केला. त्यानंतर आता जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून प्रसाद लाड यांनी तर त्यांना थेट आमदारकीची ऑफर देऊन टाकली. या ऑफरवर जरांगे पाटलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला आहे.
प्रसाद लाड यांच्या ऑफरवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "एकीकडे ते मला दादा म्हणतात, भाऊ म्हणतात. आम्हीही त्यांना दादा, भाऊ म्हणतो. पण आता ते लगेच मला मॅनेज करायला लागले आहेत. शेवटी त्यांनी फोडोफोडीचे संस्कार घेतलेच. राजकारण या खऱ्या जातीवर आता ते आले आहेत," अशा शब्दांत जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?
मनोद जरांगे यांच्यावर टीका करताना प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं की, "सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली. गोरगरीब कुटुंबाला महिन्याला दीड ते ३ हजार मिळत असतील तर त्याला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला पाहिजे, विरोधकांच्या छत्रीखाली जाऊन टीका करू नये. मनोज जरांगेंनी समाजकारणात राजकारण आणू नये. विरोधकाची भूमिका घेऊ नये. जर त्यांना राजकारण करायचं असेल मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या. मनोज जरांगेनी राजकारणात यावं, आमदार व्हावं. तसंच आणखी एका सहकाऱ्याला सोबत घेत आमदार करावं. विधान परिषदेत त्यांची भूमिका मांडावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू. पण मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हे योग्य नाही. चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू. मराठा आरक्षणासाठी आम्ही नक्कीच तुमच्यामागे आहोत," असं आमदार लाड यांनी म्हटलं होतं.