आदित्य लोकसभा निवडणूक लढवणार का?; उद्धव ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:28 AM2019-03-14T06:28:50+5:302019-03-14T06:29:27+5:30
सुजय विखे पाटील यांच्यावरुन उद्धव यांचा शरद पवारांना टोला
मुंबई : आदित्य आताची लोकसभा निवडणूक लढणार नाही, पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही, हे तो आणि शिवसैनिक ठरवतील. त्याबाबत माझे त्याच्यावर कोणतेही बंधन नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन उद्धव यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढणार, अशी जोरदार चर्चा प्रसिद्धी माध्यमांमधून दोन दिवसांपासून होती. त्यावर, आदित्य यावेळी लढणार नाहीत, असे सांगत उद्धव यांनी भविष्यात त्यांच्या लढण्याबाबतची शक्यता कायम ठेवली.
राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने सुजय यांनी भाजपात प्रवेश करीत उमेदवारी मिळविली. त्यावर, ‘आपल्या मुलांचा हट्ट ज्याचा त्याने पुरवावा, दुसऱ्याच्या मुलांचा हट्ट मी का पुरवू,’ असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावर पवार यांना त्यांनी चिमटा काढला. उद्धव म्हणाले, मी माझ्यासोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी वापरायची असतात, असा आमचा विचार नाही. शिवसेना सर्वसामान्यांसाठीच आहे. युतीच्या प्रचाराची रणनीती काल रात्री ठरली आहे. कुठेही दगाफटका होणार नाही. ते म्हणाले की, आधी स्वत: लढण्याची घोषणा करणे आणि नंतर माघार घेत, मावळमधून नातवाला पुढे करणे हे जे काही चालले आहे, ते पवारनीतीला धरूनच आहे. आम्ही बोलतो ते करतो, ते बोलतात, त्याच्या उलट करतात.