...तर काश्मीरचाही लिलाव करतील, "सामना"तून सरकारला झोडलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 07:46 AM2017-06-30T07:46:48+5:302017-06-30T07:55:07+5:30

50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून...

... will also auction the Kashmiri, throws the government to the "face" | ...तर काश्मीरचाही लिलाव करतील, "सामना"तून सरकारला झोडलं

...तर काश्मीरचाही लिलाव करतील, "सामना"तून सरकारला झोडलं

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 -  गेली 10 वर्षे सतत तोट्यात असलेल्या आणि डोक्यावर 52 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडिया या देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र "सामना"तून केंद्र सरकारला चांगलंच झोडलं आहे. 
 
50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही, अशा प्रखर शब्दामध्ये सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. एअरइंडियाच्या कर्जाचं पाप हे कॉग्रेसचं असल्याचं सामनात म्हटलं आहे पण त्यासोबतच काँग्रेस राजवटीत हे पाप झाले असेल तर ते धुऊन काढण्याची संधी मोदी सरकारला होती. ते त्यांनी का केले नाही? असा सवालही भाजपाला विचारला आहे. 
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर   
‘महाराजा’ची विक्री!
50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही. एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक होते. ‘महाराजा’ हे आमच्या वैभवाचे व आदरातिथ्याचे प्रतीक होते. ‘महाराजा’चे आधीच कोसळलेले संस्थान सरकारने खालसा केले आहे.
अखेर एअर इंडिया विकायला काढायचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही वेळ आधीच्या राज्यकर्त्यांनी आणली हे खरे, पण नवे सरकार येताच परिस्थिती सुधारेल असे वाटले होते. रेल्वेचे आणि एअर इंडियाचे खासगीकरण करणार नाही असे कालपर्यंत सांगितले जात होते, पण एअर इंडियाच्या ‘महाराजा’ला खांदा देण्याचे काम आमच्याच बादशाही सरकारने केले. काँग्रेस राजवटीत हा निर्णय झाला असता तर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस सरकारचे वस्त्रहरण केले असते. ज्यांना एअर इंडिया चालवता येत नाही ते देश काय चालविणार? असा सवाल केला असता, पण आज हिंदुस्थानची ‘National Carrier’ म्हणून ओळखली जाणारी एअर इंडिया विक्रीस काढण्यात आली आहे. एअर इंडियावर ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. शिवाय ४ हजार कोटींच्या व्याजाचे ओझे आहे. गेल्या दहा वर्षांपासून एअर इंडिया तोटय़ात आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती पोसायचा कशाला? असे देशाच्या अर्थमंत्र्यांना वाटते, पण एअर इंडियाची ही अशी घसरगुंडी का व कुणामुळे झाली, ‘महाराजा’स भिकारी करून रस्त्यावर आणणारे गुन्हेगार कोण याबाबत अर्थमंत्री काही बोलणार आहेत की नाही? एकेकाळी एअर इंडिया जगात सर्वोत्तम होती. ‘महाराजा’प्रमाणे एअर इंडियाचा थाटमाट होता, पण राजकारणी व नोकरशहांनी मिळून एअर इंडियाची वाट लावली. उधळपट्टी व गैरव्यवस्थापनामुळे आज ही वेळ आली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातला एअर इंडियाचा वाटा ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत घसरला याचे कारण फायद्यात चालणारे अनेक ‘मार्ग’ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने खासगी विमान कंपन्यांना विकले. हा भ्रष्टाचार आहे. काँग्रेस राजवटीत हे पाप झाले असेल तर ते धुऊन काढण्याची संधी मोदी सरकारला होती. ते त्यांनी का केले नाही? की त्यांनाही उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवायचीच होती? राज्य बदलले म्हणून एअर इंडियाची हालत सुधारली नाही व ‘महाराजा’च्या ऐटीत भर पडली नाही. मुंबईतले एअर इंडियाचे मुख्यालय हलवून ते दिल्लीस नेले. तिथेच ‘महाराजा’च्या साम्राज्याचा पाया ढासळला. हे सर्व ठरवून केले व महाराजाला माती खायला लावून नोकरशहा व राज्यकर्त्यांनी आपले खिसे भरले. एअर इंडियाच्या कर्मचाऱयांत फूट पाडून फोडा-झोडा व राज्य करण्याची नीती एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने स्वीकारली. ५० हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही. एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक होते. ‘महाराजा’ हे आमच्या वैभवाचे व आदरातिथ्याचे प्रतीक होते. ‘महाराजा’चे आधीच कोसळलेले संस्थान सरकारने खालसा केले आहे.
 
 
 

Web Title: ... will also auction the Kashmiri, throws the government to the "face"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.