आमच्याकडेही कोणीतरी लक्ष देईल का?
By admin | Published: May 12, 2016 01:34 AM2016-05-12T01:34:37+5:302016-05-12T01:34:37+5:30
ती तुमच्या कुटुंबाची केअर करते, तिलासुद्धा कुटुंब आहे, ती तुमच्या बाळाची काळजी घेते, तिलासुद्धा बाळ आहे,
जागतिक परिचारिका दिन
पुणे : ‘ती तुमच्या कुटुंबाची केअर करते, तिलासुद्धा कुटुंब आहे,
ती तुमच्या बाळाची काळजी घेते, तिलासुद्धा बाळ आहे,
...आता तरी कोणी म्हणा ती आमची नर्स आहे.’
या ओळीप्रमाणेच परिचारिका आपले घर-दार विसरून सेवा करीत असतात. खासगी रुग्णालयात तर वेतन, ड्यूटीबाबत कोणतेही निकष नाहीत. आमच्याकडेही कोणीतरी लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांशी चर्चा केली असता, यांनी व्यथा कथन केल्या. दहा-बारा तास ड्यूटी, तुंटपुंजा पगार, नोकरीची शाश्वती नाही. हक्काच्या सुट्याही नाहीत. रुग्णसेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या परिचारिकांचे हे वास्तव आहे. त्यांच्या वेतनाच्या आणि ड्यूटीबाबत निकष नसल्याने प्रत्येक ठिकाणी वेगवगळे नियम आहेत. खासगी रुग्णालये आलिशान बनत चालली असली, तरी परिचारिकांकडे मात्र लक्ष दिले जात नाही. तीन वर्षे चार-पाच लाख रुपये नर्सिंगच्या शिक्षणासाठी खर्च केल्यानंतर सात-आठ हजार रुपयांवर नोकरी करावी लागते. शासकीय रुग्णालयापेक्षा अधिक काम आणि पगार मात्र कमी असो. शासकीय रुग्णालयामध्ये एक किंवा दोन नाइट केल्यानंतर एक डे आॅफ दिला जातो. खासगी रुग्णालयामध्ये तीन-चार नाइटनंतर एक दिवस सुट्टी दिली जाते, अशी व्यथा अनेक परिचारिकांनी व्यक्त केली. अनेक रुग्णालयांमध्ये परिचारिकांसाठी सुरक्षित चेंजिंग रूम नाहीत, लॉकर्स नसतात, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचरवरून रुग्णाला घेऊन जाणे, नातेवाइकांच्या प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागतो. तरीही परिचारिका अत्यंत शांतपणे रुग्णांची सेवा करीत राहतात. (प्रतिनिधी)
> शासकीय रुग्णालयामध्येदेखील काम करणाऱ्या परिचारिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णालयातील असुविधा आणि नियोजनाअभावी अनेक प्रश्न उपस्थित होतात. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बेड, स्वच्छता, डॉक्टरांचा अभाव, भूलतज्ज्ञांचा अभाव, बंद एक्सरे मशीन, यामुळे रुग्णांच्या नेतवाइकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना परिचारिकांना घाम फुटतो. परिचारिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. महिला कक्ष, लॉकर्स, चेंजिंग रूम नसल्याने त्यांची अडचण होते. अनेकदा प्रशासन आणि डॉक्टारांच्या चुकांचा त्रास परिचारिकांना सहन करावा लागतो.
- अनुराधा आठवले : महाराष्ट्र शासकीय नर्स फेडरेशनच्या अध्यक्षा