संमेलनाला शिक्षकांची उपस्थिती रोडावणार?
By admin | Published: January 30, 2017 01:55 AM2017-01-30T01:55:11+5:302017-01-30T01:55:11+5:30
शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
जान्हवी मोर्ये, डोंबिवली
शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीचा सूर असून ते संमेलनाला पाठ दाखवण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनाला मराठी हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षकांना संमेलनास उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना तीन दिवस भरपगारी रजा दिली जाणार आहे. मात्र, दुसरीकडे आयोजकांनी त्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्कात सूट दिलेली नाही. त्यांच्याकडून तीन हजारांचे शुल्क आकारले जाणार आहे. ते भरण्यास शिक्षक तयार नाहीत. परंतु, अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी सक्ती करीत आहेत, अशी माहिती काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी मराठीवर उपजीविका असणाऱ्यांनी शुल्क भरल्यास त्यात काही वावगे नाही. त्यांच्याकडून हे मराठीसाठी दान समजले जाईल. तसेच मराठीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रुपये द्यावे, असेही आवाहन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी कमीतकमी १० रुपये व जास्तीतजास्त १०० रुपये दिले तरी आयोजकांना चालणार आहे. ही बाब उघडपणे केली जाणार नसली तरी हा निधी घेतला जाणार आहे.
संमेलनासाठी आतापर्यंत एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. अन्य माध्यमांतून आणखी ६० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. निधी कमी जमा झाल्याने विविध मार्गांनी मदत कशी मिळेल, यावर आयोजकांचा अधिक भर आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना वेठीस धरले जात आहे, अशी भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
साहित्य संमेलन हा उत्सव नाही. तरी त्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. उत्सवप्रिय शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्याची घाई झाली आहे. खरोखर विद्यादान करणारे शिक्षक संमेलनापासून दूर राहिल्यास तेथे केवळ उत्सवप्रिय शिक्षकांची गर्दी दिसू शकते. संमेलनास चाळिशीच्या पुढील वर्ग उपस्थित असतो.
सध्याची पिढी ही मराठीऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याने तिला संमेलनाविषयी आवड व अप्रूप नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही कितपत सहभागी होतील, याविषयी शंकाच व्यक्त होत आहे.
केडीएमसीच्या क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन होत आहे. मात्र, तेथे पालिकेचे अवघे दोन सुरक्षा कर्मचारी असल्याने ते अपुरे पडत आहेत. त्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याने चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने केली होती. मात्र, चौकी उभारणे शक्य नसून २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त ठेवला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.क्रीडासंकुलात पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा, मैदान असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रात्री मैदानात मद्यपान, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचे खुलेआम सेवन केले जाते. भुरट्या चोरांनी बाथरूममधील नळ आदी साहित्य चोरून नेले आहे. स्वच्छतागृहही खराब करतात. त्यामुळे चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने आगरी युथ फोरमने केली होती. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे चौकी उभारणे शक्य नाही. मात्र, मान्यवर येणार असल्याने २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त तैनात केला जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, यामुळे संमेलन पाच एकर जागेवर भरणार असून दोन खाजगी सुरक्षारक्षक कसे पुरतील, असा प्रश्न आयोजकांना आहे.