कुलगुरूंची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:51 AM2017-07-27T02:51:33+5:302017-07-27T02:51:36+5:30
मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराची चौकशी करून कुलगुरूंवरील कारवाईबाबत सभागृहाच्या भावना राज्यपालापर्यंत पोहोचवू, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.
मुंबई : मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराची चौकशी करून कुलगुरूंवरील कारवाईबाबत सभागृहाच्या भावना राज्यपालापर्यंत पोहोचवू, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले. ३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या ४७७ परीक्षांपैकी केवळ १०४ परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, आॅनलाइन असेसमेंटचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याबाबतची सूचना काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी मांडली होती. यावर तावडे म्हणाले की, पेपर तपासणीसाठी नागपूर आणि पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचीही मदत घेतली जात आहे. आतापर्यंत ६९.२४ टक्के उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या आहेत.
‘मेरिट ट्रॅक’च्या मुसक्या आवळणार
आॅनलाइन असेसमेंटची जबाबदारी असणाºया मेरिट ट्रॅक कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तडकाफडकी कारवाई केल्यास न्यायालयात कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नियमांच्या चौकटीतच कारवाई करण्यात येत आहे. मेरिट ट्रॅकने कामात कसूर केली असून, त्याला माफी दिली जाणार नाही, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
सव्वा पाच लाख पेपर
कला शाखेच्या सुमारे ६२ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी असून, दोन दिवसांत हे निकाल जाहीर केले जातील. याशिवाय, वाणिज्य शाखेचे ३ लाख ७५ हजार, विधीचे ४० हजार आणि व्यवस्थापन शाखेचे २८ हजार अशा एकूण सव्वा पाच लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम बाकी आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.